इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानावर असणारे, सर्वात मोठ्या ई – कॉमर्स कंपनी एमॅझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या विशेष बोटीसाठी एक ऐतिहासिक पूल तोडला जाणार आहे. या बोटीची किंमत ४८५ मिलियन डॉलर आहे. ही सुपरबोट थ्री – मास्टेड पद्धतीची असून तिची उंची ४० मीटर आहे. पूल तोडण्याचा खर्च बेझोस स्वतः उचलणार आहेत.
जेफ बेझोस यांची बोट ४१७ फूट लांब आहे. त्याचे कोड नाव Y721 आहे. बेझोस त्यांच्या महागड्या जीवनशैलीसाठी ओळखले जातात. गेल्या वर्षी त्यांनी ब्लू ओरिजिन या त्यांच्या स्पेस कंपनीच्या पहिल्या पॅसेंजर फ्लाइटने अवकाशयात्रा केली होती. आता त्यांच्या सुपरबोटीची चर्चा सर्वत्र पसरली आहे. नेदरलँडच्या किनारी असलेल्या रॉटरडॅम शहरातील स्थानिक सरकारने सांगितले की, बेझोसच्या आलिशान बोटीला मार्ग देण्यासाठी १८७८ मध्ये बांधण्यात आलेल्या, या १४४ वर्षे जुन्या पुलाचा एक भाग पाडला जाईल. ही सुपरबोट वाहून नेण्यासाठी पुलाचा मधला भाग तोडण्यात येणार आहे. हा पूल हिटलरशी संबंधित असल्याची माहिती यांनी दिली आहे. अब्जाधीश बेझोस या पुलाबाबत येणाऱ्या सर्व खर्चाची रक्कम चुकती करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रक्रियेला काही आठवडे लागतील आणि येत्या उन्हाळ्यात होण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या सैन्याने या पुलावर बॉम्बचा वर्षाव केला होता. या बॉम्बहल्ल्यात पुलाचे नुकसान झाले होते.
https://twitter.com/nypost/status/1489499219840884743?s=20&t=j4oR89E3NGJJaq-49zSdJg
२०१७मध्ये या पुलाची दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानंतर स्थानिक कौन्सिलने या पुलाशी कधीही छेडछाड करणार नाही असे आश्वासन दिले होते. पण, ही सुपरबोट समुद्रात नेण्याचा हा एकमेव मार्ग आहे आणि पूल हटवल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे बेझोसची नौका गेल्यानंतर हा पूल पुन्हा बांधला जाईल, असे स्थानिक सरकारचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये मात्र नाराजी आहे.