मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
संबंधित तथ्ये जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही रुग्णाच्या मृत्यूला वैद्यकीय निष्काळजीपणा मानला जावू शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशात नोंदवले आहे. कायद्याच्या व्याख्येमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, की एखाद्या डॉक्टरला चुकीच्या कारणामुळे किंवा धाडसामुळे किंवा निर्णयाच्या अभावामुळे एका योग्य उपचाराच्या पद्धतीला दुसऱ्यापेक्षा प्राधान्य दिल्याने गोष्टी चुकीच्या झाल्या. याबद्दल जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.
राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाच्या (एनसीडीआरसी) आदेशाविरुद्ध एका महिलेने आणि तिच्या मुलांनी दाखल केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत होते. फिर्यादींनी केलेल्या आरोपांनुसार हे प्रकरण शस्त्रक्रियेनंतरच्या वैद्यकीय उपचारात झालेल्या निष्काळजीपणाचे नाही, या निष्कर्षावर एनसीडीआरसी पोहोचले होते. त्यानंतर याचिका फेटाळली होती. त्याविरोधात फिर्यादींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती अभय ओक यांचे खंडपीठ म्हणाले, की रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू होऊ शकतो. डॉक्टरांनी योग्य देखभाल करणे अपेक्षित आहे. परंतु संकटातून बाहेर काढल्यानंतर प्रत्येक रुग्ण घरी जाईलच, असे आश्वासन कोणताच व्यावसायिक डॉक्टर देऊ शकत नाही. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे किंवा नाही हा न्यायनिवाडा करणारा अधिकारी पोहोण्यापूर्वी वैद्यकीय पुराव्याबाबत पुरेशी सामग्री असणे आवश्यक आहे. संबंधित वस्तूस्थिती जाणून घेतल्याशिवाय रुग्णाच्या मृत्यूलाही वैद्यकीय निष्काळजीपणा मानता येणार नाही.
न्यायालय म्हणाले, की वैद्यकीय क्षेत्रात उपचाराबाबत वेगवेगळे दृष्टीकोन असू शकतात. विचारांमध्ये वास्तविक मतभेद असू शकतात. तथापि, एका प्रकारच्या उपचारपद्धीचा अवलंब करताना डॉक्टरांनी स्वीकारलेले वैद्यकीय नियम त्यांच्या सर्वोत्तम कौशल्य आणि योग्यतेनुसार आहेत, हे डॉक्टरांनी सुनिश्चित करणे आवश्यक आहे.