मुंबई – भयपट (हॉरर मूव्ही) पहाणार्यांना त्यांचा आपल्यावर किती प्रमाणात परिणाम होतो, हे लक्षात येत नाही. जसे चांगल्याकडे चांगले आणि वाईटाकडे वाईट आकर्षित होते, तसे पुष्कळ प्रमाणात नकारात्मकता असलेला भयपटाचा ‘सेट’, त्यात भूतबाधा झालेल्याची भूमिका करणारा अभिनेता किंवा असा भयपट पहाणारे प्रेक्षक यांकडे मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती आकर्षित होते. परिणामी संहिता लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्या माध्यमातून अधिकाधिक नकारात्मकता प्रक्षेपित करणार्या चित्रपटाची निर्मिती होते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते इस्तांबूल, तुर्कस्थान येथे आयोजित ‘सिक्स्थ इंटरनॅशनल इंटरडिसप्लिनरी कॉन्फरन्स ऑन मेमरी अँड द पास्ट’ या परिषदेत बोलत होते. त्यांनी ‘भयपट आपल्यावर आध्यात्मिक स्तरावर परिणाम करतो का ?’ हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक आहेत, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.
श्री. क्लार्क यांनी ‘प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)), बायोवेल (Biowell), आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून भयपटांचे होणारे सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यासाठी केलेल्या संशोधनातील निष्कर्ष सादर केले.
‘यू.ए.एस्.’ चाचणी
चाचणीच्या अंतर्गत प्रयोगशाळेतील स्टुडिओमध्ये भयपट पाहिलेल्या 17 व्यक्तींच्या नकारात्मकतेत सरासरी 107 टक्के वाढ झाली. काहींच्या बाबतीत ती वाढ 375 टक्के इतकी होती. प्रयोगापूर्वी ज्या व्यक्तींमध्ये सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (ऑरा) होती, त्यात 60 टक्के घट आढळली, तर काहींची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ समूळ नष्ट झालेली आढळली.
‘बायोवेल’द्वारा केलेला अभ्यास
चित्रपट पहाण्यापूर्वी एका व्यक्तीच्या केलेल्या चाचणीत तिची सर्व चक्रे सर्वसाधारण रेेेषेत होती. त्यांचा आकारही खूप मोठा होता. याचा अर्थ ती व्यक्ती स्थिर आणि ऊर्जावान होती. चित्रपट पाहिल्यानंतर मात्र तिची चक्रे अव्यवस्थित दिसली, त्यांचा आकारही लहान झाला होता, म्हणजे ती व्यक्ती अस्थिर आणि तिची सर्वसाधारण क्षमता कमी झालेली दिसली.
या संशोधनाद्वारे हेच जाणले की, ‘भयपट’ पाहिल्याने केवळ भावनात्मक परिणाम होत नसून सूक्ष्म स्पंदनांच्या स्तरावरील होणार्या भयंकर परिणामांची आपल्याला जाणीवही नसते. सूर्यास्तानंतर वाईट शक्तींचा प्रभाव वातावरणावर अधिक असल्यामुळे त्या वेळी असे चित्रपट पहाणे अधिक धोकादायक असते.