भुवनेश्वर (ओडिसा) – पूर्वीच्या काळी विधवा झाली म्हणून महिलांचे केशवपन केले जात असे. तसेच काही लोकांना विनाकारण शिक्षा म्हणून त्याचे तोंड काळे करून गाढवावर बसून त्याची धिंड काढली जायची. परंतु स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षात भारतात लोकशाही असतानाही एकीकडे स्वातंत्र्य, समता, स्त्री – पुरुष समानता आणि महिलांचा सन्मान यासारख्या गोष्टींची चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र आजही एका महिलेचे केशवपन करीत तोंड काळे करून तिची धिंड काढली जाते, ही अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी गोष्ट आहे.
ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील पट्टामुंडाई गावात मानवतेला लाजिरवाणी ठरणारी एक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेचे मुंडन करून तिच्या चेहऱ्यावर काळ फासल्याची व धिंड काढल्याची घटना स्थानिक लोकांच्या एका गटाने उघडकीस आणली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका महिलेने सरकारी बँकेतून कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन देऊन काही लोकांची फसवणूक केली, असा त्या लोकांनी आरोप केला होता. पीडित महिलेने कर्ज मंजूर करण्यासाठी काही लोकांकडून १२ हजार रुपये घेतले आणि त्यांना सर्व पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र जमावाने तिच्याकडून जबरदस्तीने २५ हजार रुपये आणि काही दागिने घेतले. इतकेच नव्हे तर काही स्त्री -पुरूषांनी या पिडीत महिलेचे केशवपन आणि चेहरा काळा करून धिंड काढली. या प्रकरणी पट्टामुंडई पोलीस स्टेशनला पीडितेची तक्रार आल्यानंतर कारवाई सुरू झाली आहे. व्हिडिओतील पुराव्यांच्या आधारे १० महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.