पाटणा, बिहार (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. परंतु या लशीकरण मोहिमेत अनेक गैरप्रकार आणि घोटाळे उघड होत आहेत. या मोहिमेत आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असले तरी पारदर्शकता राहत नसल्याची बाब समोर येत आहे. बिहारमध्ये एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मधेपुरा जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने एक-दोनदा नव्हे तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतली आहे. त्याला ही लस कशी प्राप्त झाली, त्याने ती का घेतली, आता या नागरिकाचे पुढे काय होणार असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
आपण ११ वेळा लस घेतल्याचा दावा खुद्द या ज्येष्ठ नागरिकानेच केला आहे. त्यातही तब्बल बाराव्यांदा लस घेण्याचा प्रयत्न केल्यानेच हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या वृद्धाने वारंवार लशीकरण करण्याचे कारण आणि त्याचे फायदे देखील सांगितले आहेत. यात विशेष बाब म्हणजे त्यांनी अकरा वेळा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊनही लस घेतली आहे.
https://twitter.com/ANI/status/1478957237330604032?s=20
मधेपुरा जिल्हयाच्या पुरैनी तालुक्यातील औरई गावात राहणारे ८४ वर्षीय ब्रह्मदेव मंडल यांनी गेल्या १० महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी ११ वेळा कोरोनाची लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर गुडघेदुखी कमी झाल्याचे ते सांगतात. म्हणूनच त्याने अनेक वेळा लशी घेतल्या. ग्रामीण डॉक्टर म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. लस घेण्याच्या तारखाही त्यांनी एका कागदावर नोंदवल्या आहेत.
लशीचा १२ वा डोस घेण्याचाही प्रयत्न केला तेव्हा पण लस संपली होती, तसेच त्यांनी सांगितले की, ही लस मी एकाच आधार कार्डवर आणि त्याच मोबाईल फोनवर घेत आहे. राज्य सरकार कशावरही लक्ष ठेवत नाही. मात्र मी माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी लस घेत आहे. तसेच मला आणखी लसीकरण करायचे आहे. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच चौकशीचे आरोग्य विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुख्य वैद्यकिय अधिकारी अमरेंद्र प्रताप शाही यांनी चौसा आणि पुरैनी विभागाच्या प्रभारी डॉक्टरांकडून अहवाल मागवला आहे. त्याचप्रमाणे या तील दोषींवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.