मुंबई/औरंगाबाद/बीड – संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यात तब्बल ४०० जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. विशेष म्हणजे या गैरकृत्यात एका पोलिसाचाही समावेश आहे. पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असून त्याद्वारेच हा सर्व प्रकार समोर आला आहे.
देशभरात दररोज शेकडो नव्हे तर हजारो अल्पवयीन मुली आणि महिलांवर लैंगिक अत्याचार होत असतात, यामध्ये विनयभंग आणि बलात्काराची देखील प्रकरणे आहेत परंतु काही प्रकरणे अत्यंत संतापजनक आणि भयानक अमानुषपणे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारण्याची प्रकारही देशभरात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशाच प्रकारची अत्यंत लाजीरवाणी घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सुमारे सहा महिने सतत सुमारे चारशे जणांनी बलात्कार केले असून त्यात एका पोलिसाचा देखील समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून संपूर्ण बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
राज्यात विशेषतः बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यात सुमारे ६० पोस्कोचे गुन्हे दाखल होत आहेत. त्यातच अंबेजोगाईमधील घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून सदर अल्पवयीन पिडीत मुलगी बालकल्याण समितीकडे आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता ती २० आठवड्याची गर्भवती असल्याचे आढळले. तिच्यावर सुमारे ५ ते ६ महिन्यांत पैशाचे, जेवणाचे आमिष दाखवून सुमारे ४०० वेळा अत्याचार करण्यात आला. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या आईचे ४ वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हा ती मुलगी ८ वर्षाची होती, तिचे वडील मोलमजुरीचे काम करत असताना त्यांनी आर्थिक विवंचनेमुळे या मुलाचे वयाच्या १३ व्या वर्षी तिचे लग्न एका पुरुषाशी लावून दिले. ती एक वर्षाहून अधिक काळ सासरी असताना सासरची मंडळी तिला त्रास देत असत. त्यामुळे ती माहेरी आली आणि काही दिवसांनी ती नोकरीच्या शोधात अंबेजोगाई शहरात आली.
येथे दोन नराधमांनी नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. यानंतर एका पोलिसासह शेकडो लोकांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. एकूण ४०० वेगवेगळ्या जणांकडून तिला लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला , त्यातही पीडित मुलगी ३ते ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात येत आहे. आता पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.
याप्रकरणी बाल कल्याण समिती पीडितेचा गर्भपात करण्याची प्रक्रिया करीत आहे. याप्रकरणी सध्या नऊ जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या पित्यासह चार आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत असून अंबाजोगाई शहरातील सर्व लॉजिंगची तपासणी करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे पीडितेने बाल कल्याण समितीकडे नोंदवलेल्या जबाबात म्हटले आहे की, ती याआधी आंबेजोगाई शहर पोलीसात करण्याचा बलात्काराची तक्रार करण्यासाठी गेली होती. मात्र पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही. उलट त्यावेळी कार्यरत असलेल्या पोलिसानेच लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने आपल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कारवाई सुरू आहे. मात्र सूज्ञ नागरिक म्हणून अशा घटना रोखण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ. अभय वणवे यांनी केले आहे. मात्र या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत.