पायाखालच्या मातीचा गंध
कवितेच्या भाळावर मिरविणारा
मातीतला कवी : लक्ष्मण बारहाते
कवी लक्ष्मण बारहाते हे अत्यंत संवेदनशील मनाचे कवी आहेत.त्यांचा ‘पाच दिघे’ हा काव्यसंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरला आहे.ग्रामीण भागात बालपण गेल्याने तिथले संजीवक अनुभव घेऊन त्याची कविता येताना दिसते.
ग्रामीण वास्तव हाच त्यांच्या चिंतनाचा विषय राहिल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांचे चित्र त्यांच्या कवितेतून चितारले गेले. त्यांची कविता म्हणजे त्यांचा आत्मसंवाद होय. त्यामुळे बऱ्याच कवितेतून त्यांची आत्मनिष्ठा कवितेतून शब्दबद्ध होत गेली आहे.त्यामुळे सहाजिकच त्यांची कविता ही आत्मकेंद्रित होत गेलेली दिसते.परंतु तिचे स्वरूप व्यक्तिगत स्तरावरून सर्वस्पर्शी झाल्याने तिची व्यापकता नक्कीच वाढली आहे. शेतकऱ्यांची व्याकूळता आणि त्यांच्या मानसिकतेला पोखरणारी भावविवशता यातून त्यांची कविता शब्दबद्ध होताना दिसते.
कवीच्या बालमनावर ग्रामीण जीवनाचे, तिथल्या मातीचे संस्कार झाले आहेत. ते संस्कार त्यांच्या कवितेत पदोपदी ठळकपणे जाणवतात. कारण त्या वातावरणाचा कवीच्या मनावर तसेच त्यांच्या कवितेवर कळत नकळत संस्कार होत गेले. असे स्पष्ट जाणवते.कवी लक्ष्मण बारहाते यांच्या बहुतेक कवितांचे सौंदर्य वाचकाना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या ‘पाच बिघे’ या काव्यसंग्रहातून झालेले आत्मनिष्ठ जाणिवांचे प्रकटीकरण हे वाचकांच्या अनुभूतीस समरस होताना दिसतात. त्यामुळे कवी लक्ष्मण बारहाते यांच्या पाच बिघ्यातल्या कवितांमधून ग्रामीण जीवनाचे, तिथल्या वास्तवाचे, हलाखीचे स्वच्छ नितळ आकलन वाचकांना सहजपणे होत जाते. त्यांच्या बहुतांशी कवितांमध्ये भूमीनिष्ठ जाणीव प्रकट होताना दिसते. त्यांच्या अनेक कवितांमधून भावपूर्ण संवेदना व्यक्त होताना दिसतात. त्यांची शेती मातीशी नाळ जुळलेली असल्याने त्यांच्या कवितांची नाळ सुध्दा मातीशी जुळली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या पाच बिघ्यातल्या कविता या अगदी साध्या सरळ शब्दातून व्यक्त होत जातात.
कवी लक्ष्मण बारहाते यांच्या कवितेतली सहजता आणि स्वाभाविकता ही वाचकांना जाणवल्याशिवाय राहत नाही. कारण ग्रामीण भागात जीवन जगताना गरिबी आणि दारिद्र्याचे अनेक चटके अनुभवलेले असल्याने, त्यातून कवीला आलेले जीवन जगण्याचे भान व्यक्त होताना दिसते.
कवी बारहाते आपल्या कवितेतून हेच जीवनभान अभिव्यक्त करताना दिसतात. त्यातून त्यांच्या विचारांची प्रगल्भताही अनेकदा जाणवत राहते. त्यांच्या जीवनानुभवाचे जीवनसत्वे कवितेतून खूपदा प्रभावीपणे येत राहतात. ते एका कवितेत लिहितात ‘गाय वासरांचे / जरी झाले वाटे / वासरू एकटे / सोडू नये’ किंवा ‘फिरवावे पाणी / एकाच दांडाने / फुटीचे बियाणे पेरू नये’ मला वाटतं या त्यांच्या ओळी किती मोठे जीवनभाष्य मांडून जातात.अलीकडे मतभेदांच्या भिंती रक्ताच्या नात्यात उभ्या राहतात..त्या भिंती पाडण्याचे काम त्यांची कविता करते.
खरं तर जीवनाचा महत्त्वाचा सिद्धांतच या ओळी मांडून जातात. त्याचबरोबर कवी मनाची संवेदनशीलता अधोरेखित करून जातात. थोडक्यात त्यांच्या कविता वाचकांच्या सात्विकतेला जाग आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कवितेत अनेकदा जागोजागी विठ्ठल भेटतो. कारण शेतकऱ्यांचे दुःख निवारण्याचे विद्यापीठ जर कोणते असेल तर ते आहे पंढरपूर. पंढरपूरच्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तर तो वारीतून मिळतो.
हजारो वर्षांची ही वारीची परंपरा आपण पाहतो,अनुभवतो. कुणब्यांना, कष्टकऱ्यांना, कास्तकारांना दुःख सोसण्याची, परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती विठ्ठल देतो. अशी कविमनाची निष्ठा असल्याने त्यांच्या पाच बिघ्याच्या काठामेराला जागोजागी विठ्ठल डोकावताना दिसतो. पाच बिघ्यात काबाडकष्ट करणाऱ्या माणसाच्या जीवनाची दाहकता त्यांच्या कवितेत ओतप्रोत भरलेली दिसते. त्यांच्या कवितेत जगण्याचा संघर्ष आहे. शेतकऱ्यांची विषण्णता आहे. कास्तकारांच्या जीवनातली विदारक भीषणता आहे. त्यांची संपूर्ण कविता ही कृषीवलांच्या व्यथांचे प्रतिनिधित्व करताना दिसते. त्याचबरोबर सामाजिक विषमता, अराजकता त्यांची कविता टिपत जाते, मांडत जाते.
कवी लक्ष्मण बारहाते यांच्या पाच बिघ्यातल्या कविता खूप काही देऊन जातात. अनाथ बालकाला आईचे अंगाईगीत देतात. आई-बापाची साथ देतात. पाच बिघ्यातून पाईनभर जमिनीचं सुख वाटतात.कित्येकांचा आधार होत धीर देतात. समतेची गाणी शिकवतात. मातीशी खेळायला,पिकांशी बोलायला आणि आभाळ झेलायला शिकवतात. लक्ष्मण बारहाते यांची कविता माय-बापाचे संस्कार शिकवते. सामाजिक विषमतेवर टोकदार भाष्य करते. ठोकरले अन् नाकारलेपणाच्या वेदनांची भयावकता दाखवते. मातीबद्दलची अतोनात कृतज्ञता शिकवते.ग्रामीण प्रतिमा आणि प्रतीकातून जीवनाचं वास्तव मांडते.
जगण्याची धडफड आणि मनाची तडफड अभिव्यक्त करते. पावसाचे विविध स्वभावधर्म, विविध रूप अधोरेखित करते. मानवी मनोवृत्तीचे वास्तव रूप दाखवते. तसेच मातीतल्या राबणाऱ्या प्राणिमात्रांची कथा मांडते. मातीतल्या अबीर बुक्क्याचा गंध वाटते. जाती धर्मात वाटल्या गेलेल्या माणसांच्या रक्तालाच रक्ताचा वास यावा, हे विदारक सत्य सांगून जाते. शासनाचे बहिरेपण, पुढाऱ्यांचे आंधळेपण स्पष्ट शब्दात सांगून जाते. माणसांना लागलेल्या मोहाची लागवण आणि वासनेची हगवण ती परखडपणे व्यक्त करते. त्याचबरोबर कुणब्याच्या दुःखाचे आणि त्याच्या भोगाचे वारस त्यांचीच मुलं ठरतात, हे अधोरेखित करून जाते.
वाहत्या गंगेत कुणी कुणाचं धुणं न धुता स्वतःला पारखायला शिकविते. आज जिथं सावली आहे उद्या तिथं ऊन पडल्याशिवाय राहत नाही. आणि दैवं वांझ निघाल्यावर गोत्र आपोआपच दुरावत जातं.हे कटुसत्य सांगून जाते.तसेच उजेडाची जागा नेहमी अंधार व्यापतो.हे जगण्याचं तत्वज्ञान मांडून जाते. भक्तीआड पाप लपवण्यापेक्षा मनातले साप ठेचायला शिकवते. शेतात राबणाऱ्या हातांची कहाणी आणि वेद्नाशील बोटांची व्यथा मांडते. माणसांच्या मनोवृत्तीचे विविध सत्तर उलगडून दाखवते. गोराबाची जीव ओतून शीव ओलांडून वैकुंठ गाठण्याची गोष्ट सांगते. व्यथा-वेदनाची मोळी बांधून दूर फेकायला सांगते. तसेच दुःखाची झोळी इंद्रायणीत बुडवायला शिकविते.
कवी लक्ष्मण बारहाते मातीबद्दल आपल्या कवितेत लिहितात ‘काळा देह क्षारांनी झाकला फुलणारा जीव धुळीने माखला / एकराला हेक्टरचे मोल येत असले / तरी कुणब्यांचे श्वास रोज खोल खोल जात आहे’ हे मातीचे दुःख अधिक गडदगहिऱ्या शब्दातून व्यक्त केले आहे. आयुष्याच्या उभ्या-आडव्या पाच बिघ्यात कवितांचे आडसाली पीक घेणारा हा कवी सातत्याने शेती मातीशी जोडून आहे. त्यांच्या ‘पाच बिघे’ या काव्यसंग्रहाला मातीचा गंध आहे. जीवनाचा सुगंध आहे. दृष्टांताचा पूर आहे, सूर आहे.विठोबाचा बुक्का आहे,तसाच प्रस्थापितांना धक्का आहे. भक्तीचा रंग आहे, विठ्ठलाचा संग आहे, मातीचा रंग आहे, तुकोबा गोरोबाचे अभंग आहे. अभंगाचे छंद आहे,जगण्याचे बंद आहे.
राजकारणी टोप्या आहे, सत्तेची खुर्च्या आहे. सनातनी सोंगं आहे,मतलबी ढोंगं आहे. मरणाची होळी आहे, लुटारूंची टोळी आहे.कुणब्याचा बळी आहे. मरणाच्या कळा आहे, दुष्काळाच्या झळा आहे, जप्तीचा टाळा आहे. आणि कर्जाच्या दोरात अडकलेला सामान्यांचा गळा आहे .धान्याची रास आहे,गळ्यातला फास आहे. गरीबीचे रंग आहे, लुटारूंचा संग आहे. गुदमरलेला श्वास आहे, रक्ताचा वास आहे. गाव आहे, पार आहे, आयुष्याचे सार आहे. इतकंच नव्हे तर रानावनात पांगलेला प्राजक्ताचा गंध आहे,काळ्या-तांबड्या मातीचा वेदनामय सुगंध आहे.
असे कवीमनाचे लक्ष्मण बारहाते नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात. त्यांनी मराठी विषयात एम.ए.बी,एड पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांच्या‘पाच बिघे’ या काव्यसंग्रहाला नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचा सन २०११चा ‘विशाखा पुरस्कार’ ,कोपरगाव जि.अहमदनगर येथील ‘स्व.भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य निर्मीती पुरस्कार’, अहमदनगर येथील ‘डॉ.भास्कर हिवाळे साहित्य पुरस्कार’, तसेच भुसावळ येथील‘स्व.बाबासाहेब के. नारखेडे राज्यपुरस्काराने’ त्यांना सन्मानित केलेले आहे. गिरणा गौरव प्रतिष्ठानचा स्मिता पाटील पुरस्कार.कवी आनंद जोर्वेकर स्मृती काव्य पुरस्कार,नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा कवी गोविंद व छंदोमयी काव्य पुरस्कार मिळालेला आहे. नेहमी पायाखालच्या मातीचा गंध आपल्या कवितेच्या भाळावर मिरविणाऱ्या कवी लक्ष्मण बारहाते यांच्या काही कविता त्यांच्याच आवजात ऐकुया.