नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इग्नाइट अकॅडेमीच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडविण्याचे काम अविरत सुरू आहे. देशात जेव्हा जबाबदार नागरिक असतील तोपर्यंत संविधानात्मक प्रणाली ही सुरळीत सुरू राहणार आहे. त्यामुळे संस्थेचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. तसेच राज्याचा राज्यकारभार संविधानानुसार सुरळीत चालण्यासाठी अधिकाऱ्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज इग्नाइट अकॅडेमीच्या ‘यशवंत’ विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नाशिक शहरातील एमराल्ड पार्क येथे पार पडला.
यावेळी पोलिस उपअधीक्षक निलेश पालवे, सहायक परिवहन अधिकारी सचिन बोधले, संचालक धनंजय कचाले,प्रतीक रोडे, शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर,सागर हंगे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, संविधानावर आधारित देशाचा कारभार हा अतिशय सुरळीत चालण्यासाठी अधिकारी वर्गाचे कार्य हे अतिशय महत्वपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य निर्माण केले. त्याचा आदर्श घेऊन सर्व अधिकारी वर्गाने काम करायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारे असून त्यानुसार आपला राज्यकारभार चालतो. त्यामुळे राज्यकारभार चालविण्यासाठी अधिकारी वर्गाची भूमिका ही अतिशय महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्या समाजातून पुढे येऊन आपल्या आयुष्यात जे यश मिळविले आहे. त्या समाजाचे ऋण कधी विसरू नये. आपला समाज हा पुढे येण्यासाठी या यशवंत विद्यार्थ्यांनी काम करावे. आपल्या समाजासाठी अविरत योगदान द्यावे. तसेच आपल्याला मिळालेलं ही अंतिम नाही त्यामुळे यशवंत झालेल्या या विद्यार्थ्यांनी किर्तीवंत होण्यासाठी यापुढेही यश मिळवत रहावे असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, इग्नाइट अकॅडेमीच्या प्लॅटफॉर्मवर पंधरा लाखांहून अधीक विद्यार्थी जोडले गेले असून, ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून दरवर्षी किमान ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.आजवर देशभरात शासनाच्या विविध विभागात इग्नाइट अकॅडेमीचे हजारो यशस्वी विद्यार्थी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. इग्नाइट अकॅडेमीच्या वतीने ‘माफक शुल्कात दर्जेदार मार्गदर्शन’ हा वसा घेऊन राज्यभरात एका दशकाहून अधिक काळ राष्ट्र आणि समाजासाठी ‘सुजाण व संवेदनशील’ अधिकारी निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे.