पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संरक्षण आणि संशोधन विकास संस्था ( डीआरडीओ)चे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या लॅपटॉपमध्ये नग्न छायाचित्रे आढळली असून त्यांच्याविरुद्ध एटीएसने तब्बल २ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
डीआरडीओचे संचालक असताना प्रदीप कुरुलकर हे झारा दासगुप्ता या महिलेशी मोबाईल वॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून संपर्कात होते. झारा दासगुप्ता या नावाने बनावट अकाऊंट पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांकडून चालवण्यात येत होते. कुरुलकरांनी झारा दासगुप्ताला भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेबद्दल संवेदनशील माहिती दिली. कुरुलकर भारताच्या डीआरडीओच्या वेगवेगळ्या लॅबोरेटरीजची माहिती देखील पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणाना द्यायचे. ज्या कालावधीत कुरुलकर झारा दासगुप्ताच्या संपर्कात होता त्याच कालावधीत तो सातवेळा विशेष पासपोर्टवर परदेशात जाऊन आला आहे.
कुरुलकर झारा दास गुप्ताला संवेदनशील माहिती जशी द्यायचे त्याचबरोबर तिच्याशी अश्लील भाषेत चॅटिंग देखील करायचे. झारा दासगुप्ता आणि कुरुलकर हे नग्न होऊन एकमेकांशी चॅटिंग करायचे आणि त्याचे फोटो कुरुलकरच्या लॅपटॉपमधे आढळून आले आहेत. प्रदीप कुरुलकर यांनी डीआरडीओची आणखी कोणती संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिलीय याचा तपास एटीएसकडून सुरुच राहणार आहे.
सांताक्रुझच्या गेस्ट हाउसवर
प्रदीप कुरुलकर हे डीआरडीओच्या मुंबईतील सांताक्रुझ भागातील गेस्ट हाउसवर अनेक महिलांना भेटायचे. यातील एकही महिला त्यांच्या नात्यातील किंवा डीआरडीओमध्ये कर्मचारी नव्हती. ऑक्टोबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत कुरुलकर ज्यावेळी सांताक्रुझमधील गेस्ट हाऊसला राहिले त्यावेळचे सीसीटीव्ही फूटेज तपासले असता ही धक्कादायक माहिती समोर आली. ज्या कालावधीत कुरुलकर झारा दासगुप्ता या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होते त्याच कालावधीत झालेल्या या गेस्ट हाऊसमधील भेटी आहेत. त्यामुळे त्यांचा काही परस्पर संबंध आहे का, याचा एटीएस तपास करत आहेत.