इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील ७२ वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि आजी- माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा खळबळजनक दावा नाशिक दौ-यावर असलेल्या एका मोठ्या राजकीय नेत्याने पत्रकारांशी बोलतांना अनौपचारिक गप्पा मारताना केला आहे. या सर्वांचे वादग्रस्त आणि संवेदनशील व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. हे सर्व जण हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
यात नाशिकमधील एका बड्या अधिका-याचाही समावेश आहे. यासबंधीच्या व्हिडिओबद्दलही या नेत्याने भाष्य केल्यामुळे त्याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे. नाशिकच्या पंचतारांकित सुविधा असलेल्या हॅाटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. नाशिच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात याबाबत एका महिलेने तक्रार केल्याची माहितीही सांगण्यात आली. संबधित अधिका-यांचे आणि नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्यामुळे कोणीही अधिकारी किंवा नेता या ट्रॅपबद्दल उघडपणे समोर येण्यास तयार नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सध्या गुलदस्त्यात आहे.
नाशिकसह मुंबई, पुणे येथील बड्या अधिका-यांचा आणि नेत्यांचा या हनीट्रॅप प्रकरणात सहभाग असल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ बाहेर आल्यास अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.