मुंबई – बॉलिवूडमधील प्रख्यात रॅपर हनी सिंग चांगलाच अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. हनीची पत्नी शालिनी तलवार हिने अतिशय गंभीर आरोप केला आहे. हनी सिंग आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने माझा मानसिक, शारिरीक आणि शाब्दिक छळ केला असल्याची तक्रार शालिनीने पोलिसांकडे केली आहे. हनी हा अन्य मुलींसोबत सेक्स करायचा आणि मला अतिशय क्रूर वागणूक द्यायचा. अनेकदा त्याने मारहाणही केली. गेली १० वर्षे मी हा कौटुंबिक हिंसाचार कसा सहन केला हे माझे मलाच माहित आहे. एखाद्या प्राण्याप्रमाणे मला हनी क्रूर वागणूक द्यायचा, असेही तिने म्हटले आहे.
शालिनीने आणखी एक गंभीर आरोप केला आहे. तो म्हणजे, हनीचे वडिल म्हणजे तिचे सासरे हे सुद्धा अत्यंत वाईट आहेत. एकदा मी बेडरुममध्ये कपडे बदलत असताना ते बेडरुममध्ये आले. आणि त्यांनी माझ्या छातीवरुन हात फिरविला, असा आरोप शालिनीने तक्रारीत केला आहे. माझ्यावरील अन्यायाचे पुरावे माझ्याकडे असून ते वेळोवेळी न्यायालयासमोर सादर करेल, असेही शालिनीने म्हटले आहे. याप्रकरणी हनी सिंगला न्यायालयाने नोटिस बजावली असून त्याचे म्हणणे विचारले आहे.