मुंबई – गायक आणि रॅपर हनी सिंग यांच्यावर त्यांची पत्नी शालिनी तलवार हिने केलेल्या गंभीर आरोपांमुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. त्यामुळे हनी सिंगने पहिल्यांदाच सोशल मीडियावर आपले अधिकृत वक्तव्य शेअर करत या आरोपांवर आपले मौन तोडले आहे.
हनी सिंगने अधिकृत निवेदनात लिहिले की, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर गेल्या २० वर्षांपासूनच्या जीवनात सहभागीदार असलेल्या पत्नीने केलेल्या खोट्या आणि वाईट आरोपांमुळे मी अत्यंत दु: खी आहे. सदर कथित आरोप गंभीर व निंदनीयही आहेत. यापुर्वी माझ्या गाण्यांवर कठोर टीका झाली असून माझ्या आरोग्याबद्दलची नकारात्मक मीडिया कव्हरेज प्रसिद्ध झाले असूनही मी कधीही सार्वजनिक निवेदन किंवा प्रेस नोट जारी केली नाही.
तथापि, या वेळी मला या प्रकरणी गप्प राहणे योग्य वाटले नाही. कारण माझ्या कुटुंबावर, माझ्या वृद्ध आई-वडिलांवर आणि धाकट्या बहिणीवर आज संकट आले आहे. अशा कठीण प्रसंगी माझ्या पाठीशी अनेक लोक उभे राहिलेले आहेत. कारण मी गेल्या १५ वर्षांपासून या उद्योगाशी संबंधित आहे. देशभरातील कलाकार व संगीतकारांसोबत काम केले आहे. माझ्या पत्नीबरोबरच्या माझ्या प्रेमळ नात्याबद्दल प्रत्येकालाच माहिती आहे. कारण ती एक दशकाहून अधिक काळ माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग राहिली आहे. तसेच शुटिंग, इव्हेंट्स आणि मीटिंगसाठी नेहमीच माझ्याबरोबर सोबत आहे.
हनी सिंग पुढे म्हणतो की, मी सर्व आरोप पूर्णपणे नाकारतो. पण यापुढे टिप्पणी करणार नाही. कारण हे प्रकरण न्यायालयासमोर विचाराधीन आहे. तसेच या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे की, सत्य लवकरच बाहेर येईल. आरोपांना उत्तर देण्याची संधी न्यायालयाने दिली आहे. दरम्यान, मी माझ्या चाहत्यांना आणि जनतेला नम्रपणे विनंती करतो की, जोपर्यंत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालय निर्णय देत नाही, तोपर्यंत माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल कोणताही निष्कर्ष काढू नये.