पुणे – होंडा कंपनीतर्फे एका नव्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला सादर करण्याची तयारी सुरू झाली आहे. या एसयूव्हीचे कॉन्सेप्ट व्हर्जन ११ नोव्हेंबरला होणार्या गायकिंडो इंडोनेशिया इंटरनॅशनल ऑटो शो (जीआयआयएएस) मध्ये सादर केले जाईल. या कॉन्सेप्ट मॉडेलचे नाव Honda N5X असे ठेवले जाण्याची शक्यता आहे. नव्या BR-V या सात सीटरमध्ये देण्यात आलेले फ्रंट-व्हील-ड्राइव्ह प्लॅटफॉर्म कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये देण्यात आले आहेत. हे प्लॅटफॉर्म एसयूव्हीला बळकट बनवतात.
कंपनीतर्फे या नव्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा टिझर जारी करण्यात आला आहे. यामध्ये कारचे साइड प्रोफाइल दाखविण्यात आले आहे. त्यामध्ये ७ सीटर मॉडेलसारखाच ए-पिलर, डॅशबोर्ड, हुड आणि दरवाजे देण्यात येणार आहेत. टिझरमध्ये एलइडी हेडलँप, रूफ-इंटिग्रेटेड स्पॉयलर, रॅप-अराउंड टेल लाइट्स आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजी दाखविण्यात आली आहे. दिसण्यात ही एसयूव्ही BR-V चे कॉम्पॅक्ट व्हर्जनच दिसत आहे.
नव्या एसयूव्हीमध्ये BR-V एसयूव्हीसारखेच इंटिरिअर आणि फिचर्स दिले जाऊ शकते. त्यामध्ये CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह १.० लिटर ३ सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असू शकतात. १.५ लिटर नॅच्युरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा वापरही होऊ शकतो. हे इंजिन १२१ बीएचपी आणि १४५ एनएमचा टार्क निर्माण करू शकतात. त्यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायाचाही समावेश असेल.
होंडा कंपनीतर्फे सांगण्यात आले की, भारतीय बाजारासाठी नवी एसयूव्ही तयार करण्याचे काम सुरू आहे. नवे मॉडेल होंडा सिटीच्या प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. त्याची लांबी ४.२ मीटर किंवा ४.३ मीटरच्या आसपास असेल. भारतीय बाजारात होंडाच्या नव्या एसयूव्हीची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Skoda Kushaq आणि VW Taigun या वाहनांसोबत होणार आहे. नव्या एसयूव्हीचा एक लाँग व्हिलबेस व्हर्जनसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. या वाहनाची Hyundai Alcazar, Tata Safari, Mahindra XUV700 आणि MG Hector यांच्याशी स्पर्धा होईल.