विशेष प्रतिनिधी, मुंबई
विविध कारणांनी अपात्र असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना (होमगार्ड्सना) पुन्हा कामावर सामावून घेण्याबाबत गृहरक्षक दलाने परिपत्रक काढले होते. परंतु त्या परिपत्रकाची माहिती सर्वांना मिळाली नाही. त्यावर प्रधान सचिव यांनी सर्व जिल्ह्यातील वस्तुस्थिती तपासून त्वरित निर्णय घ्यावा असे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी.पाटील यांनी गृहरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना दिले.राज्यातील गृहरक्षक दलाच्या विविध समस्यांबाबत राज्यमंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
बंदोबस्त मानधन वेळेत द्या
काही जिल्ह्यांमध्ये गृहरक्षक दलाचे बंदोबस्त मानधन अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.ते देण्याच्या दृष्टीने वित्त विभागाकडून प्राप्त निधी बीडीएसवर प्राप्त झाल्यावर पाच दिवसात ते मानधन होमगार्ड्सना देण्याबाबत परिपत्रक काढावे असे निर्देशही राज्यमंत्री श्री.पाटील यांनी दिले.
विमा योजनेवर चर्चा
होमगार्ड्सना विमा योजनेचा कशाप्रकारे लाभ देता येईल यासंदर्भात विमा कंपनीशी तांत्रिक बाबींवर चर्चा करावी. अपर पोलिस अधिक्षक यांनी होमगार्ड समस्यांबाबत प्रत्येक महिन्यात किमान एक बैठक घेउून होमगार्डंसच्या समस्यांचा आढावा घ्यावा.सद्यस्थितीत राज्यात कोविड-19 परिस्थितीमुळे वय वर्षे 50 ते 58 वर्षे वयाच्या होमगार्डसना कोविड-19 चा धोका पहाता बंदोबस्तकामी बोलाविण्यात आलेले नाही. तथापि 50 ते 58 वर्षांवरील होमगार्ड सदस्यांना कोविड संसर्ग कमी असलेल्या भागात (विशेषत: Level 1) त्यांची सुरक्षा विचारात घेऊन बंदोबस्त देण्याबाबत विचार करण्यात यावा असे निर्देशही राज्यमंत्री श्री.पाटील यांनी दिले.
या बैठकीस प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना, गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक प्रशांत बुरडे , बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, होमगार्ड विकास समितीच्या अध्यक्ष श्रीमती आर.डी. लाखन आदी मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.