इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बंगळुरू हे शहर आयटी आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये करियर करणाऱ्या तरुणांचे स्वप्नांचे शहर आहे. त्यामुळे देशभरातील तरुण नोकरीच्या निमित्ताने बंगळुरूमध्ये जात असतात. पण बंगळुरूमध्ये भाड्याने घर हवे असेल तर तुम्हाला बारावीत ९० टक्के गुण अपेक्षित आहेत, असा अघोषित फतवा निघाला की काय, अशी घटना अलीकडेच घडली.
बंगळुरूमधील ही घटना सध्या सोशल मिडियामध्ये चांगलीच चर्चेत आहे. शुभ नावाच्या एका तरुणाने त्याच्या भावासोबत घडलेला प्रकार ट्वीट केला आणि त्यानंतर नेटकरी चांगलेच तुटून पडले. भाड्याने खोली देण्यासाठी ९० टक्के गुण अपेक्षित असल्याचे सांगणारा घरमालक आता ट्रोल होत आहे. योगेश नावाचा तरुण नोकरीसाठी बंगळुरूमध्ये दाखल झाला. त्याला भाड्याने घर हवे होते. त्याने एका ब्रोकरशी संपर्क साधला. ब्रोकरने त्याला घरमालकाच्या अटी-नियमांची माहिती दिली. घरमालकाने डिमांड केलेली प्रत्येक गोष्ट त्याने पुरवली. त्यानंतर ब्रोकर आणि योगेश यांच्यात झालेले चॅट शुभने ट्वीटरवर शेअर केले आहे.
योगेशने पुरविलेल्या कागदपत्रांवर आणि माहितीवर घरमालक समाधानी असला तरीही त्याने एकाच गोष्टीत अडचण असल्याचे सांगितले आहे. आणि ते म्हणजे योगेशला बारावीत केवळ ७५ टक्के गुण होते. बंगळुरूसारख्या शहरात एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळविणाऱ्या योगेशला बारावीत मिळालेल्या ७५ टक्के गुणांमुळे घरमालकाने भाड्याचे घर नाकारले. घरमालकाला बारावीत ९० टक्के अपेक्षित असल्याचे ब्रोकरने योगेशला म्हटले आहे. शुभने ही घटना ट्वीट करताना एक कॅप्शन टाकलं आहे. ‘गुण तुमचे भविष्य ठरवत नाहीत, पण तुम्हाला बंगळुरूमध्ये फ्लॅट मिळेल की नाही हे निश्चितपणे ठरवते’, असे शुभने म्हटले आहे. विशेष म्हणजे अशी विचित्र मागणी करणारा घरमालक आयआयएममधील निवृत्त प्राध्यापक आहे.
हे मागितले घरमालकाने
भाड्याने घर देण्यासाठी घरमालकाने योगेशला त्याचे ट्वीटर प्रोफाईल, लिन्क्डइन प्रोफाईल, तो ज्या कंपनीत नोकरीला आहे त्या कंपनीचे प्रोफाईल, जॉयनिंग लेटर, दहावी आणि बारावीची गुणपत्रिका, आधार आणि पॅनकार्ड या गोष्टी मागितल्या. यासोबतच स्वतःबद्दल २०० शब्दांचा लेखही घरमालकाने लिहायला सांगितला.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
बंगळुरुमध्ये जर तुम्ही मोलकरणीला तुम्ही आयटी कंपनीत काम करता असे सांगितले तर ती घरकामासाठी दहमहा 30 हजार मागेल आणि हेच जर तुम्ही आयटी सेक्टरमध्ये काम करत नाही हे तिला पटवून देऊ शकलात तर ती घरकामासाठी दरमहा 9 हजार मागेल. लवकरच आम्ही बंगळुरुला शिफ्ट होत असून भाड्याने घर मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षेच्या तयारीत आहोत
"Marks don't decide your future, but it definitely decides whether you get a flat in banglore or not" pic.twitter.com/L0a9Sjms6d
— Shubh (@kadaipaneeeer) April 27, 2023
Home Rent Criteria HSC 90 Percent