मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अधिपत्याखालील पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक आणि इतर कार्यालयांच्या आस्थापनांवरील एकूण ६८ अस्थायी पदांना दि. १ मार्च ते दि. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार आस्थापनांवरील मानसेवी बालरोगतज्ज्ञ यांची ४८ पदे आणि इतर वेगवेगळ्या संवर्गातील २० पदे अशा एकूण ६८ अस्थायी पदांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या पदांना मुदतवाढ देण्याबाबत शासनाला विनंती करण्यात आली होती.
या अस्थायी पदांना अटी व शर्तींच्या अधीन राहून शासनाने मुदतवाढ दिली असून या अटींनुसार ही मुदतवाढ सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त असलेल्या पदांना लागू राहणार नाही. ही ६८ पदे ज्या अटी व शर्तींच्या अधीन मंजूर करण्यात आली आहेत, त्यांचे काटेकोरपणे अनुपालन करण्यात यावे. पोलीस महासंचालकांनी सर्व पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध शासनाच्या मान्यतेसाठी तात्काळ सादर करावा. यानंतर आकृतीबंध निश्चित करण्याकरिता या पदांची मुदत वाढवून मिळणार नाही, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
Home Ministry Police Posts Extension