मुंबई – पोलीस शिपाई भरती 2018 मधील प्रतीक्षा यादीतील महिला उमेदवाराने नियुक्तीबाबत तिच्यावर व अन्य 800 उमेदवारांवर अन्याय होत असून आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागेल असे निवेदन समाजमाध्यमावर केले आहे. त्याबाबत गृह विभागामार्फत पोलीस शिपाई भरती 2018 मधील भरतीची सर्व पदे भरण्यात आली असल्याने प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांचा नियुक्तीसाठी विचार शक्य नाही, असे गृह विभागामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.
पोलीस शिपाई भरती २०१८ – वस्तुस्थिती
पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक (लोहमार्गासह) यांचे आस्थापनेवरील / समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १ ते ११ व १३ ते १६ यांचे आस्थापनेवरील तसेच सशस्त्र पोलीस शिपाई यांची (पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई यांची) रिक्त असलेली ६१०० पदे भरण्यासाठी mahapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०५/०२/२०१८ ते दिनांक २८/०२/२०१८ रोजी अर्ज मागविण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेत एकूण १०,७४,४०७ एवढ्या उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. सदर भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी व लेखी परीक्षा या क्रमाने परीक्षा घेऊन घटक प्रमुखांच्या आस्थापनेवर रिक्त असलेली ६,१०० पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.
पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रकरणी संबंधित घटक प्रमुख हे नियुक्ती प्राधिकारी असल्याने त्यांच्या स्तरावर प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली होती व ज्या उमेदवारांनी काही कारणास्तव नियुक्ती नाकारली होती त्यांच्या रिक्त पदावर प्रतीक्षा यादीतील त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या असून याप्रकारे एकूण ४५६ प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.
एकंदरीत सन २०१८ मध्ये ६१०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती व ही सर्व पदे सदर भरती प्रक्रियेमधून भरण्यात आली आहेत. प्रस्तुत प्रकरणी प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्यासंदर्भात उमेदवारांकडून तसेच काही लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे निवेदने प्राप्त झाली असून या निवेदनांच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांसह शासन स्तरावर यापूर्वी वेळोवेळी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैठकांमध्ये नियुक्तीची मागणी करणाऱ्या उमेदवारांच्या सर्व प्रश्नांचे/शंकांचे निराकरण करण्यात आले आहे.
सन २०१९ मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील ५२९७ रिक्त पदांच्या भरतीसाठी दोन टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून दि.०३/०९/२०१९ व दि. ३०/११/२०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातींच्या अनुषंगाने एकूण ११,९७,४१५ अर्ज प्राप्त झाले आहेत. ही भरती प्रक्रिया ऑक्टोबर २०२१ अखेर पूर्ण करण्याचे संकल्पित असून त्या दृष्टीने कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
वरील वस्तुस्थिती विचारात घेता, सन-२०१९ ची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु झालेली असल्याने तसेच सन २०१८ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील सर्व पदे भरण्यात आलेली असल्याने प्रचलित शासन तरतुदीनुसार प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांचा आता पोलीस शिपाई पदावर नियुक्तीसाठी विचार करणे शक्य होत नाही, असे गृह विभागाचे सहसचिव व्यं.मा.भट यांनी कळविले आहे.