इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दिल्लीतील त्यागराज स्टेडिअममध्ये आपल्या कुत्र्यासाठी खेळाडूंना त्रास देणाऱ्या आयएएस अधिकारी दाम्पत्याला गृहमंत्री अमित शहा यांनी चांगलाच दणका दिला आहे. प्रधान सचिव संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा हे स्टेडिअममध्ये आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन येत असल्याने खेळाडूंना सराव करता येत नव्हता. त्यामुळेच गृहमंत्रालयाने तडकाफडकी या दाम्पत्याची बदली केली आहे. खिरवार यांना लडाख तर दुग्गा यांना अरुणाचल प्रदेशमध्ये पाठविण्यात आले आहे.
एका प्रशिक्षकाने सांगितले होते की, “आम्ही पूर्वी रात्री ८–८.३०पर्यंत सराव करायचो. पण आता आम्हाला संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मैदान सोडण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून अधिकार्याला त्या मैदानावर त्यांच्या पाळीव कुत्र्याला घेऊन फिरता येईल. आमचे प्रशिक्षण आणि सराव त्यामुळे विस्कळीत झाला आहे.”
स्टेडियमचे प्रशासक अजित चौधरी यांनी सांगितले की संध्याकाळची अधिकृत वेळ ४ ते ६ वाजेची आहे. परंतु सध्याच्या उन्हाच्या कडाक्याच्या परिस्थितीत ते खेळाडूंना ७ वाजेपर्यंत सराव करण्यास परवानगी देतात. मात्र याबाबत कोणताही अधिकृत आदेश नाही. संध्याकाळी ७ नंतर कोणताही सरकारी अधिकारी सुविधा वापरत असल्याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्हाला संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मैदान बंद करावे लागते. हीच सरकारी कार्यालयीन वेळ आहे. हे मैदान दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील एक सरकारी कार्यालय आहे. येथे कोणताही अधिकारी आपल्या पाळीव कुत्र्याला चालण्यासाठी सुविधा वापरत आहेत याची मला काहीही माहिती नाही. मी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत स्टेडियम सोडतो आणि मला त्याची जाणीव नाही.“
https://twitter.com/ANI/status/1529862108002672641?s=20&t=GDJ43yC6OIoaZFTJxaY5NQ