मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलीसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. 40 वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेन्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलीसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी सह पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. राजवर्धन, सेवेन्स टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अनिल जग्यासी, अपोलो क्लिनिकचे संचालक डॉ. संजय कपोते, निशा चॅरिटी यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अपोलो क्लिनिकचे संचालक श्री. कपोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली अनेक वर्षे राबविलेला पोलीस आरोग्य तपासणी कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. दिवसरात्र कर्तव्यावर असतांना पोलीसांचे आरोग्याकडे कळत नकळत दुर्लक्ष होत असते. आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर तपासणी करण्यापेक्षा नियमितपणे आरोग्य तपासणी झाल्यास वेळीच काळजी घेवून भविष्यातील मोठे आजार टाळता येऊ शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे दोन हजार वाहतूक पोलीसांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच भविष्यात मुंबईतील सर्व पोलीसांची आरोग्य तपासणी करण्याचा डॉ. कपोते यांचा मानस आहे. या उपक्रमासाठी राज्य शासनामार्फत परवानगी आणि सर्वातोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी डॉ. कपोते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
Home Minister Fadanvis on Police Health Check up