मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील मशिदींवरील भोंगे सुरूच राहणार की बंद होणार याचा मोठा खुलासा आज झाला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भोंग्यांप्रश्नी मंत्रालयात आज सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. या बैठकीवर भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांनी बहिष्कार घातला. मनसेच्यावतीने राज ठाकरे यांच्याऐवजी नेते संदीप देशपांडे उपस्थित होते.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे. गृह विभाग आणि पोलिस त्यासाठी सक्षम आहेत. बैठकीमध्ये सविस्तरपणे चर्चा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याअनुषंगाने राज्य सरकारने २०१५ ते २०१७ या काळात विविध प्रकारचे शासन निर्णय काढले आहेत. या आदेशांमध्ये सर्व प्रकारची स्पष्टता देण्यात आली आहे. या निर्णया आधारेच भोंगे लावले जातात. तसेच, सध्या सुरू असलेले भोंगे काढण्याबाबत राज्य सरकारला कारवाई करता येत नाही, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
ते पुढे म्हणाले की, परवानगी घेऊनच भोंगे लावणे आवश्यक आहे. तसेच, जे भोंगे सुरू आहेत त्यांचा विहित मर्यादेतच आवाज असणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. राज्यात अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात त्यात भजन, जत्रा, किर्तन, काकड आरती, अजान आदींचा समावेश आहे. त्यामुळे सरसकट भोंगे काढायचे म्हटले तर ते शक्य नाही.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्यापही कायम आहे. त्यांनी ३ मे रोजीचा अल्टीमेटम दिला आहे. तशी स्पष्ट माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.