जम्मू – भारतच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये कायमच दहशतवाद्यांचा संचार राहीलेला आहे. याला कारण म्हणजे सीमेपलीकडून पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घातले आहे. परंतु आता काश्मीरप्रश्नी कायमचा तोडगा निघावा आणि दहशतवादाचा बंदोबस्त व्हावा, यासाठी केंद्र सरकार विविध योजना करत आहेत याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून काश्मीर दौऱ्यावर आहेत.
काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा आज या राज्यात पोहोचत आहेत. येथे तीन दिवस मुक्काम करून शहा हे खोऱ्यातील सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. याशिवाय जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा कशी वाढवता येईल, याचेही नियोजन केले जाईल. या महिन्यात आतापर्यंत दहशतवाद्यांनी 11 निष्पाप नागरिकांचीही हत्या केली आहे. असे प्रकार काही वर्षांनंतर पुन्हा दिसून येत आहेत. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा निष्पाप नागरिकांनाही लक्ष्य करणे सुरू केले आहे.
सुरक्षेसंदर्भातील बैठकांसोबतच अमित शाह राज्यातील पंचायत सदस्य आणि भाजप कार्यकर्त्यांनाही संबोधित करणार आहेत. तसेच भाजपच्या राज्यातील जिल्हाध्यक्षांनाही या कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. या संदर्भात जम्मू -काश्मीर भाजप नेते सुनील शर्मा म्हणाले की, अमित शहा आधी जम्मूला पोहचतील आणि त्यानंतर काश्मीरला जातील. अमित शहा हे जम्मूमध्ये पक्षाच्या रॅलीलाही संबोधित करणार आहेत.
जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर अमित शहा यांची ही राज्याची पहिलीच भेट आहे. जून 2019 मध्ये त्यांनी काश्मीरला भेट दिली होती, तेव्हा भाजपने पुन्हा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवला होता. गेल्या महिन्यात दिल्लीत त्यांनी जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि इतर वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.
अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी तपासणी वाढवली आहे. एका बाजूला दहशतवाद्यांचे धाडस वाढले आहे, तर दुसरीकडे सुरक्षा दलांनीही तत्परता दाखवून दहशतवाद्यांशी सामना केला आहे. या महिन्यात आतापर्यंत सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत 17 दहशतवादी मारले गेले आहेत. यातील अनेक दहशतवादी पाकिस्तानातून आले होते.
राजौरी-पुंछ सेक्टरच्या घनदाट जंगलात गेल्या 12 दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन सुरू आहे. लष्कर-ए-तय्यबाचे दहशतवादी येथे लपल्याचा संशय आहे. परंतु एनआयएने दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी 13 जणांना अटक केली आहे. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरबाबत काय कठोर उपाययोजना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.