नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली असून या घोषणेनंतर आता सहकारी बँकेच्या ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकार सहकारी बँकांना डायरेक्ट ट्रान्सफरशी (DBT) जोडणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.
सरकारच्या ५२ मंत्रालयांमार्फत चालवल्या जाणाऱ्या ३०० योजनांचा लाभ डीबीटीद्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. त्यामुळे आता या सर्व योजनांचा लाभ सहकारी बँकांच्या ग्राहकांना मिळणार आहेत. याविषयी अमित शहा यांनी बोलताना सांगितले की, बँकिंग क्षेत्रात पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा झाली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळणार आहे. तसेच जन, धन योजनेमुळे ४५ कोटी नवीन लोकांचे बँक खातेही उघडण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा फायदा थेट बँक ग्राहकांना मिळणार आहे. सरकारच्या नव्या निर्णयामुळे ३२ कोटी लोकांना रुपये डेबिट कार्डचा लाभही मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी का संकल्प’मुळेच हा लाभ झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
तर बँकेच्या डीबीटी योजनेविषयी बोलताना अमित शहा म्हणाले की, देशाच्या समृद्धी आणि आर्थिक उन्नतीमध्ये सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे. पीएम जन धन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या कोट्यवधी नवीन खात्यांचे डिजिटल व्यवहारही एक ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहेत. तर २०१७ – १८ या वर्षातील डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत यामध्ये ५० पट वाढ झाली आहे. डायरेक्ट बँक ट्रान्सफरसह सहकारी बँका जोडल्या गेल्याने नागरिकांशी अधिक संपर्क वाढून आणि सहकार क्षेत्र बळकट होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच आरबीआय आणि नाबार्डने बँकिंगसाठी तयार केलेल्या सर्व मापदंडांवर कृषी बँकेने स्वतःला आता सिद्ध केले असल्याचेही ते म्हणाले.