मुंबई – गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न सुरू असतात. एखाद्या बँकेचे व्याजदर कमी झालेले असतील, तर तुम्ही त्वरित दुसर्या बँकेत स्थलांतरित करण्याचा विचार करतात. स्थलांतरित करण्याची प्रक्रिया काय असेल, कोणते कागदपत्रे लागतील, आदी प्रश्न तुमच्या डोक्यात सुरू असतात. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आम्ही कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बळवंत जैन यांच्याशी संवाद साधला. या संवादाचा संपादित भाग देत आहोत.
प्रश्न : गृहकर्ज स्थलांतरित का करावे
उत्तर : एखाद्या व्यक्तीने बँकेतून अथवा बिगर बँक वित्तीय संस्थेतून (एनबीएफसी) गृहकर्ज घेतले असेल तर व्याजदराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इतर बँक कमी व्याजदराने कर्ज देत असतील तर त्याने गृहकर्ज स्थलांतरित करण्याचा विचार करायला हवा. गृहकर्ज दीर्घकाळ चालणारी जबाबदारी आहे. व्याजदरातील कमी तफावतही फायदेशीर ठरू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज घेताना ओळखपत्राचे आदी कागदपत्र पूर्ण नसल्यास किंवा मालमत्तेचे कागदपत्रे नसल्यास किंवा पात्रतेत बसत नसल्यास आपण बिगर बँकिग वित्तीय संस्थांकडून अधिक व्याजदरात कर्ज घेतो. याचे कारण म्हणजे तेव्हा आपल्याकडे जास्त पर्याय नसतात. पण दोन-तीन वर्षांनंतर आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर आपण कर्जाची एकूण कर्जाची रक्कम घटविण्यासाठी कर्ज स्थलांतरित करण्याबाबत विचार करू शकतो.
प्रश्न : गृहकर्ज स्थलांतरित करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे
उत्तर : ज्या बँकेचे गृहकर्ज आहे, तेथे प्री पेमेंटवर दंड तर लागणार नाही ना हे गृहकर्ज स्थलांतरित करण्याचा विचार करणार्यांनी करावा. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रीपेमेंट किंवा रिपेमेंटसाठी बँकांनी कोणतेच शुल्क अदा करू नये. एनबीएफसी काही प्रकरणात चार्जेस लावू शकतात. जर तुम्ही फिक्स किमतीवर कर्ज घेतले असेल तर बँक तुमच्याकडून प्रीपेमेंट किंवा रिपेमेंट चार्ज घेऊ शकते. त्यासाठी किती खर्च लागेल याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. त्याशिवाय प्रोसेसिंग शुल्काकडेही पाहावे लागणार आहे. तुमचा कर्जाचा अवधी किती काळ राहिला आहे हेसुद्धा तुम्हाला पाहावे लागणार आहे. तुमचा दीर्घकाळ बाकी असेल तर तुम्ही कर्ज स्थलांतरित करू शकतात. पण थोडाच काळ शिल्लक असेल आणि स्थलांतर करण्यासाठी लागणारा खर्च व्याजदरात होणार्या बचतीपेक्षा अधिक असेल तर मग ही प्रक्रिया रेटण्यास काहीच अर्थ राहात नाही.
प्रश्न : कर्ज स्थलांतरित करण्याची प्रक्रिया काय
उत्तर : तुमची जुनी बँक जास्त व्याजदर घेत असल्याने बँक बदलण्याचा विचार करता. इतर बँका कमी व्याजदरात कर्ज देत असेल तर तुम्हाला सर्वात आधी संबंधित बँकेशी संपर्क साधायला हवा. जास्त व्याजदर घेत असल्यामुळे कर्ज स्थलांतरित करायचे आहे, असे तुमच्या बँकेला सांगा. यादरम्यान सध्याची बँकही काहीतरी तोडगा काढून यापेक्षा चांगला व्याजदर देण्याची ऑफर देऊ शकते. बँक जर चांगल्या व्याजदराची ऑफर देणार नसेल तर तुम्ही त्यांना थेट कर्ज स्थलांतरिक करण्याबाबत सांगा. बँकेने कर्जाचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करावी. काही दिवसांतच बँकेकडून हे कागदपत्र दिले जाते. हे पत्र तुम्हाला दुसर्या बँकेला दाखवावे लागेल. नवी बँक तेवढ्या रकमेचा धनादेश तयार करून जुन्या बँकेला देऊन मालमत्तेचे कागदपत्र घेते. तुम्हाला फक्त नव्या बँकेच्या कागदपत्रांवर हस्ताक्षर करायचे असतात. तसेच केवायसीशी संबंधित कागदपत्रे जमा करायचे असतात.
प्रश्न : या प्रक्रियेला किती खर्च येतो
उत्तर : आधी सांगितल्याप्रमाणे प्रीपेमेंट किंवा रिपेमेंट शुल्क देण्याची गरज पडली किंवा प्रोसेसिंग शुल्क देण्याची गरज पडली तेवढाच तुम्हाला खर्च येऊ शकतो. अनेक प्रकरणात हे शुल्क माफ केले जाते. अनेक वेळा सणांसुदीच्या काळात हे सगळे शुल्क माफ केले जातात. त्यामुळे वेगवेगळ्या ग्राहकांना हा खर्च वेगवेगळा असू शकतो.