नाशिक – गृहकर्जाच्या बहाण्याने एकाने तब्बल ४४ लाखास बँकेस गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकाम व्यावसायीकाकडून व्यवहारासाठी घेतलेल्या कागदपत्राच्या आधारे हा गंडा घालण्यात आला असून, घर न घेता स्वतःच्या पतपेढीत बिल्डरच्या नावे खाते उघडून ही रक्कम परस्पर हडप करण्यात आली आहे. कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेच्या चौकशीत हा प्रकार समोर आला असून बँकेने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद प्रल्हाद पाटील (रा. काठेगल्ली) असे बँकेस गंडा घालणाºया संशयीत गृहकर्जदाराचे नाव आहे. याप्रकरणी पूर्वीच्या विजया बँक तथा बँक आॅफ बडोदाचे देविदास विश्वनाथ पालवे (रा. नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार संशयीत विनोद पाटील यांनी २९-०९-२०१७ ते १२ एप्रिल २०२१ दरम्यान हा गंडा घातला.
विनोद पाटील याने श्रध्दा लॅण्ड डेव्हलपर्स यांच्या शहरातील श्रध्दा हाईटस या इमारतीतील सदनिका क्रं. सी ७०५ खरेदी करण्यासाठी महात्मा गांधी रोडवरील विजया बँकेच्या शाखेत गृहकर्जाची मागणी केली होती. त्याबाबत बांधकाम व्यावसायीकाकडील कागदपत्र जमा केल्याने ३७ लाखाचे गृहकर्ज मंजूर करण्यात आले होते.
दस्त ऐवजाची पुर्तता झाल्याने बँकेने श्रध्दा लॅण्ड डेव्हलपर्स तथा बांधकाम व्यावसायीक सुरेश पाटील यांचे नावे ३७ लाख रूपयांची रक्कम अदा केली. सदरची रक्कम संशयीताने स्व:ताच्या जनसेवा बँकेत बांधकाम व्यावसायीकाच्या नावे खाते उघडून परस्पर हडप केली.
तीन ते चार वर्ष उलटूनही गृहकर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने चौकशी केली असता संशयीताने घरखरेदी न करता गृहकर्जाच्या बहाण्याने बँकेची व्याजासह ४३ लाख ९८ हजार ६३० रूपयांची फसवणुक केल्याचे समोर आले. अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.