नवी दिल्ली – गृहकर्ज घेण्यास इच्छुक ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय), कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा (बीओबी) आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) या देशातील चार नावाजलेल्या बँकानी गृहकर्जावरील व्याजदर घटविले आहेत. सणासुदीच्या दिवसात इतर बँकासुद्धा कर्जावरील व्याजदर घटविणार आहेत.
कोटक महिंद्राचा ६.५० टक्के व्याजदर
कोटक महिंद्राने व्याजदरात ०.१५ टक्के कपात करण्याची घोषणा केली असून, बँक ६.५० टक्क्यांच्या व्यादराने गृहकर्ज उपलब्ध करून देणार आहे. सणासुदीच्या दरम्यानच ही ऑफर असून ८ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असेल. वेतनावर असलेल्या आणि चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना गृहकर्ज दिले जाईल.
एसबीआयचा ६.७० टक्के व्याजदर
भारतीय स्टेट बँकेने सुणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी ६.७० टक्के व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करून देणार आहे. गृहकर्जाच्या घटविलेल्या दरांसाठी बँकेने रकमेची सर्वोच्च मर्यादा समाप्त केली आहे. आतापर्यंत बँकेकडून ७५ लाखांहून कमी कर्जासाठी पावणेसात टक्क्यांचा व्याजदर लावला जायचा. त्याहून अधिक कर्जावर ७.१५ टक्के व्याजदर द्यावा लागायचा. ०.४५ टक्क्यांनी व्याजदर घटविल्याने ३० वर्षांसाठी ७५ लाखांच्या कर्जावर आठ लाख रुपयांहून अधिक रकमेची बचत होणार आहे. बँकेने नोकरदार आणि गैरनोकरदार ग्राहकांमधील व्याजदराचे ०.१५ टक्क्यांचे अंतरही संपविले आहे.
बँक ऑफ बडोदाचा ६.७५ टक्के व्याजदर
बँक ऑफ बडोदाने किरकोळ कर्ज घेणा-यांसाठी व्याजदरात सवलत देण्यासह सणांची ऑफर सादर केली आहे. बँकेने बडोदा गृहकर्ज आणि बडोदा कार कर्जाचा सध्याचा दर ०.२५ टक्क्यांनी घटविला आहे. गृहकर्जाचा व्याजदर ६.७५ टक्के आणि ऑटो कर्जाचा व्याजदर सात टक्क्यांनी सुरू होतो. त्याशिवाय गृहकर्ज प्रक्रियेचे शुल्कात सवलत देण्याची घोषणाही बँकेने केली आहे.
पीएनबीचा व्याजदर ६.६० टक्के
पंजाब नॅशनल बँकेने सणासुदीच्या दिवसात ५० लाखांहून अधिक गृहकर्ज घेणा-या ग्राहकांसाठी व्याजदर ०.५० टक्क्यांनी घटवून ते ६.६० टक्के केले आहेत. कर्जाचा व्याजदर ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असेल. क्रेडिट स्कोअर चांगला नसलेल्या ग्राहकांना या व्याजदरावर कर्ज उपलब्ध होणार नाही.
५००० रुपयांपर्यंत हफ्ता घटणार
तुम्ही आजपासून चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये गृहकर्ज घेतले असेल. तर त्यावेळी गृहकर्जावरील व्याजदर ९.२५ टक्के होता. आता तुम्ही गृहकर्जाला कोणत्याही दुस-या बँकेत स्थलांतर करून सात टक्क्यांवर कर्ज घेणार असाल तर तुमच्या हफ्त्यात किती फरक पडेल हे जाणून घेऊया.
सध्याच्या बँकेतील कर्ज
वर्ष २०१७
कर्जाची रक्कम ३० लाख रुपये
व्याजदर ९.२५ टक्के
कालावधी २० वर्षे
कर्जाचा हफ्ता २७,४७६ रुपये
गृहकर्ज स्थलांतरित झाल्यानंतर
वर्ष – २०२१
कर्जाची रक्कम २६ लाख रुपये
व्याजदर ६.९० टक्के
कालावधी १६ वर्षे
कर्जाचा हफ्ता २२,४०० रुपये