इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुनदानानंतर आता होमगार्ड यांना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशा असंख्य सरकारी योजना, भत्ते अन कर्मचाऱ्यांचे पगार थांबले असतील. फक्त मतांसाठी आणलेल्या योजनांमुळे, सरकारी दीड हजारात मत विकत घ्यायची योजना, हे जनतेला न कळण्याएवढी जनता दूधखुळी नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर शासानाचे एक परिपत्रकही पोस्ट केले आहे.
या परिपत्रकात होमगार्डसच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यातील होमगार्ड यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्याची वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, युवा, मागास वर्ग आणि समाजातील सर्व दुर्बल घटकांना आर्थिक मदत व प्रगतीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यासाठी राज्यावरील आर्थिक भार फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे विभागाने सादर केलेला प्रस्ताव काही काळासाठी पुढे ढकलण्याबाबत किंवा सद्यःस्थितीत स्थगित ठेवण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे अभिप्राय वित्त विभागाने दिले आहेत. सबब, राज्यातील होमगार्ड यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सद्यःस्थितीत स्थगित ठेवण्यात येत आहे असे म्हटले आहे.