विशेष प्रतिनिधी, मुंबई
ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट एकूण राज्याच्या सरासरी पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे, त्या जिल्ह्यांत होम आयसोलेशन बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. तशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. होम आयसोलेशन बंद होणाऱ्या जिल्ह्यात अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार असल्याचे सांगत डॉ. टोपे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत समाधान व्यक्त केले आहे.
लसीकरणाबाबत डॉ. टोपे म्हणाले की, कोणत्याच राज्यांना लसींच्या ग्लोबल टेंडरसाठीचा कोणताही प्रतिसाद अद्याप मिळाला नाही. केंद्र सरकारने लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करावे. १८ चे ४४ वर्षे वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी जर केंद्राने राज्यांकडे सोपवली असेल तर त्यासाठी लागणारे पैसे आम्ही देतो. केंद्राने लसी आयात करावी आणि ती राज्याला पुरवावी, असेही डॉ टोपे यांनी स्पष्ट केले.
या जिल्ह्यांमध्ये होम क्वारंटाईन होणार बंद
राज्याच्या सरासरी पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे तेथील होम आयसोलेशन बंद केले जाणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पुणे, नागपूर, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात आता होम क्वारंटाईन बंद होणार आहे.
परिणाम काय होईल
ज्या कोरोना बाधितांना अत्यंत सौम्य लक्षणे आहेत ते घरीच उपचार घेतात आणि विलगीकरणात राहतात. मात्र, होम क्वारंटाईनला बंदी घातल्यानंतर सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधितांना आता कोविड सेंटर मध्ये दाखल होऊन उपचार घ्यावे लागतील. याद्वारे त्या जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणता येईल, असे सरकारचे नियोजन आहे.