मुंबई – पूर्व युरोप आणि पश्चिम आशियाच्या कोपऱ्यावर वसलेला जॉर्जिया नावाचा एक देश. भारतापासून हजारो किलोमीटर लांब. या देशाच्या उत्तरेला रशिया आणि दक्षिणेला तुर्कस्तान. पण तरीही या देशात पवित्र मानली जाणारी एका देवीच्या अस्थी अनेक वर्षे भारतात होत्या आणि आत्ता काही दिवसांपूर्वी भारत सरकारने त्या जॉर्जिया सरकारला सोपवल्या. एका अफलातून घटनेचे दोन्ही देश साक्षीदार ठरले.
परराष्ट्र खात्याचे मंत्री एस. जयशंकर काही दिवसांपूर्वी जॉर्जियाच्या दौऱ्यावर होते. तेव्हा या देशाचा दौरा करणारे ते भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री असल्याची चर्चा झाली. पण या दौऱ्याचे महत्त्व जॉर्जियाची देवी केतेवान हिच्या अस्थींनी वाढविले. जॉर्जियामध्ये पवित्र मानली जाणारी संत क्वीन केतेवान हिच्या अस्थी तेथील सरकारला सोपविले तो क्षण अत्यंत भावूक मानला जात आहे.
संत केतेवान १७व्या शतकात जॉर्जियाची राणी होती. असे म्हणतात की, तिने मुस्लीम धर्म स्विकारला नाही म्हणून इराणमध्ये तिची हत्या करण्यात आली होती. तिच्या अस्थी २००५ मध्ये गोव्याच्या एका चर्चच्या परिसरात खंडहरमध्ये सापडल्या होत्या. तेव्हापासून जॉर्जिया सरकार या अस्थींची मागणी करीत होते.
आता भारत सरकारने या अस्थिंचा एकच हिस्सा जॉर्जियाला दिला असून दुसरा हिस्सा आपल्या संग्रही ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाशी असलेल्या घनिष्ट मैत्रीमुळे भारताने जॉर्जियाच्या मागणीकडे गेल्या काही वर्षांमध्ये फारसे लक्ष दिले नाही. परंतु, आता जॉर्जियाला जवळ करून दरी संपविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. त्यादृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले.
राणीला देवीचा दर्जा
जॉर्जिया हा तसा अत्यंत धार्मिक वृत्तीचा देश. त्यामुळे त्यांनी राणी केतेवानला संतत्व बहाल केले. त्यामुळेच येथील एका चर्चमध्ये तिच्या अस्थी देण्यासाठी एस. जयशंकर गेले तेव्हा जॉर्जियाचे पंतप्रधानदेखील उपस्थित होते. या अस्थी आल्यामुळे जॉर्जियातील सर्व संकटे दूर होतील, असे मानले जात आहे.
अस्थी भारतात कश्या?
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १६३७ मध्ये या अस्थी गोव्यात आणल्या गेल्या. इथे एका चर्चमध्ये ठेवण्यात आल्या, पण नंतर त्या भग्नावशेषमध्ये रुपांतरीत झाल्या. केतेवानचे काही अनुयायी या अस्थी समुद्राच्या मार्गाने भारतात घेऊन आले होते. त्यानंतर आत्ता २००५ मध्ये पोर्तुगाली दस्तावेजाच्या आधारावर शोध घेण्यात आला तेव्हा केतेवानच्या अस्थी मिळाल्या. त्याचा डीएनए तपासल्यानंतर केतेवानच्याच अस्थी असल्याचे सिद्ध झाले.