नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियाका गेम हॉकीला देशव्यापी उत्सवात रूपांतरित करण्यासाठी आणि हॉकी खेळाडूंना देशातील घराघरात पोहोचवण्यासाठी भारताचा राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनने हॉकी इंडिया लीगसोबत भागीदारी केली आहे. 28 डिसेंबर 2024 रोजी सुरू होणारी हॉकी इंडिया लीगची यंदाची आवृत्ती ऐतिहासिक आहे कारण बहुप्रतिक्षित पुरुष स्पर्धांसोबतच महिला हॉकी इंडिया लीगचा उद्घाटनाचा हंगाम देखील सुरु होत आहे.
भारतीय खेळांना प्रोत्साहन देण्याच्या वारशासाठी प्रसिद्ध असलेले, दूरदर्शन देशभरातील लाखो प्रेक्षकांपर्यंत हॉकी इंडिया लीगचा उत्साह पोहचवणार आहे. या लीगमध्ये 8 पुरुष संघ आणि 4 महिला संघ सहभागी होतील. राउरकेला आणि रांचीमध्ये ही स्पर्धा होणार असून भारत आणि जगभरातील दिग्गज खेळाडू यात खेळताना पहायला मिळतील. महिला लीगचा समावेश खेळांमध्ये लैंगिक समावेशकता वाढवण्याच्या आणि महिला हॉकीचा एका भव्य मंचावर प्रसार करण्याप्रति हॉकी इंडियाची वचनबद्धता अधोरेखित करतो.
देशाच्या कानाकोपऱ्यात हॉकीचा प्रसार
या भागीदारीबाबत बोलताना हॉकी इंडिया लीगच्या नियामक समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप तिर्की म्हणाले, “हॉकी इंडिया लीगचे अधिकृत प्रसारक म्हणून दूरदर्शनसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. हे वर्ष विशेषतः महिला हॉकी इंडिया लीगच्या उद्घाटनामुळे विशेष आहे. महिला हॉकीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल आहे . दूरदर्शनची अतुलनीय व्याप्ती आणि खेळाप्रति बांधिलकी हॉकीला देशातील कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. लाखो लोकांना प्रेरणा देण्याचे आणि हॉकी इंडिया लीगला अभूतपूर्व उंचीवर नेण्याचे आमचे ध्येय आहे.”
हॉकी इंडिया लीगच्या नियामक समितीचे सदस्य भोला नाथ सिंग पुढे म्हणाले, “हॉकी हा आपल्यासाठी फक्त एक खेळ नाही – तो आपल्या एकतेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. या हंगामात महिला हॉकी इंडिया लीगचा समावेश महिला खेळाडूंसाठी समानता आणि ओळख सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक मोठी झेप आहे. आमचे भागीदार दूरदर्शनसह, हॉकी इंडिया लीगचा एक नेत्रदीपक हंगाम सादर करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ‘हॉकी आपल्याला जोडते आणि ही भागीदारी हा बंध आणखी मजबूत करते.”
प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी म्हणाले, “हॉकी इंडिया लीगसोबत भागीदारी करताना दूरदर्शनला आनंद होत आहे, हे असे व्यासपीठ आहे जे आपला राष्ट्रीय खेळ साजरा करतो आणि भारतभरातील समुदायांना एकत्र करतो. आमच्या व्यापक कव्हरेजच्या माध्यमातून महिला हॉकी इंडिया लीगच्या ऐतिहासिक उद्घाटनासह हॉकीचा सळसळता उत्साह सर्व दर्शकांसाठी पोहचवण्याचे , शहरी आणि ग्रामीण दरी सांधण्याचे आणि लीगचा प्रभाव अनेकपटीने वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. “
आता, देशभरातील -भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातले आणि खेड्यापाड्यातले चाहते दूरदर्शनवर हॉकी इंडिया लीगच्या सर्व सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचा विनाअडथळा आनंद घेऊ शकतील.
एक ऐतिहासिक पाऊल म्हणून, दूरदर्शनची हॉकी इंडियासोबतची भागीदारी सर्व राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांसाठी आहे. यापुढे हॉकी इंडियाच्या विविध श्रेणीतील सर्व राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा तसेच हॉकी इंडियाचे मालकी हक्क असलेल्या भारतातील सर्व हॉकी स्पर्धा डीडीवर प्रसारित केल्या जातील.