नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-कर्नाटकात ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) संसर्गाचे काही रुग्ण आढळल्याचे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कर्नाटकात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) संसर्गाचे दोन रुग्ण शोधले आहेत. देशभरातील श्वसनाच्या आजारांवर लक्ष ठेवण्याच्या आयसीएमआर च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून विविध विषाणूजन्य श्वसन रोगजनकांच्या नियमित देखरेखीद्वारे हे दोन्ही रुग्ण शोधण्यात आले आहेत.
भारतासह जागतिक स्तरावर एचएमपीव्ही आधीपासूनच प्रसारित आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांचे रुग्ण सापडल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शिवाय, आयसीएमआर आणि इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम (IDSP) नेटवर्कच्या सध्याच्या डेटाच्या आधारे, देशात इन्फ्लूएंझा-सारखे आजार (ILI) किंवा गंभीर तीव्र श्वसन आजाराच्या (SARI) रुग्ण संख्येमध्ये असामान्य वाढ झालेली नाही.
आढळलेल्या एचएमपीव्ही रुग्णांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
ब्रॉन्कोप्न्यूमोनियाचा इतिहास असलेले एक 3 महिन्यांचे स्त्री अर्भक, बेंगळुरूमधील बॅप्टिस्ट रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला एचएमपीव्ही ची लागण झाल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ब्रॉन्कोप्न्यूमोनियाचा इतिहास असलेले 8 महिन्यांचे पुरुष अर्भक बेंगळुरूमधील बॅप्टिस्ट रुग्णालयात दाखल केल्यानंतर 3 जानेवारी 2025 रोजी त्याला एचएमपीव्ही ची लागण झाल्याचे निदान झाले. या बालकाची तब्येत आता सुधारत आहे.
प्रभावित रूग्णांपैकी एकानेही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्व उपलब्ध निगराणी प्रणालीमार्फत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.आयसीएमआर वर्षभर एचएमपीव्ही अभिसरणातील कलाचा मागोवा घेणे सुरू ठेवणार आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) या संसर्गासंदर्भात आधीच सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी चीनमधील परिस्थितीबाबत वेळोवेळी अद्यतनित माहिती पुरवत आहे.
श्वासोच्छवासाच्या आजारांमध्ये होणारी संभाव्य वाढ हाताळण्यासाठी भारत सुसज्ज आहे आणि गरज भासल्यास सार्वजनिक आरोग्य उपाय त्वरित तैनात केला जाऊ शकतो, हे देशभरात या संसर्गाला तोंड देण्याची पूर्वतयारी म्हणून नुकत्याच करण्यात आलेल्या कवायतीने हे दाखवून दिले आहे.