इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये ब-यात लोकांना ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आता कोरोनानंतर जग दुस-या महामारीच्या उंबरठ्यावर असल्याची भिती जगभर पसरली आहे. या व्हायरसची लागण बंगळुरुतील एका ८ महिन्याच्या मुलाला झाली आहे. ताप आल्याने बाळाला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. बंगळुरुच्या लॅबने ही पुष्टी केली आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
श्वसनसंस्थेच्या या आजारात सर्दी, खोकला, ताप येतो, तो शिंका- खोकल्यातून पसरतो. पण, कोरोनाइतका हा व्हायरस घातक नाही. २००१ मध्येच त्याला विलग करुन त्याचा अभ्यास झालेला आहे. चीन, जपान, अमेरिका, कॅनडामध्ये याचे रुग्ण पूर्वीपासूनच आढळत असल्याची माहिती समोर आली आहे.
तीन दिवसापूर्वीची श्वसनाशी संबंधित आजारांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितील आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या (DGHS – Directorate General of Health Services) अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख गटाची (JMG) बैठक पार पडली होती. जागतिक आरोग्य संघटना (WHO), आपत्ती व्यवस्थापन विभाग, एकात्मिक रोग संनिरीक्षण कार्यक्रम (Integrated Disease Surveillance Programme – IDSP), राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), आपत्कालीन वैद्यकीय मदत विभाग आणि दिल्लीतील एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) रुग्णालयासह इतर रुग्णालयांमधले तज्ञ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले.
या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर आणि सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे उपस्थित प्रतिनिधींमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाली.
ताप सर्दी सदृश्य विषाणूजन्य संसर्ग अर्थात फ्लूचा सध्याचा हंगाम पाहता चीनमधील सध्याची परिस्थिती ही असामान्य नाही. या संदर्भातील उपलब्ध अहवालांमधूनही असेच सूचित गेले आहे की या ऋतुमध्ये सामान्यतः आढळून येणार्या आरएसव्ही आणि एचएमपीव्ही या रोगजन्य विषाणूंच्या संसर्गामुळेच तिथे श्वसनाशी संबंधित आजारांच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे.
सरकार सर्व उपलब्ध स्रोतांच्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, यासोबतच चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अद्ययावत माहिती सामायिक करावी अशी विनंती देखील जागतिक आरोग्य संघटनेला केली गेली आहे.
देशभरात अलिकडेच पूर्वतयारीशी संबंधीत प्रात्यक्षिके झाली. त्यातून हाती आलेल्या माहितीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर देशात श्वसनाशी संबंधित आजारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली तर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत पूर्ण क्षमतेने सज्ज आहे.
देशाची आरोग्य यंत्रणा आणि देखरेखीशी संबंधित देशभरात विस्तारलेली व्यवस्था पूर्णतः सतर्क आहेत, आणि या माध्यमातून देश अचानकपणे उद्भवणाऱ्या कोणत्याही आरोग्यविषयक आपत्ती आणि आव्हानांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असल्याची सुनिश्चिती केली जात आहे.