नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवार, 20 डिसेंबर, 2024 रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित झाले. सोमवारी, 25 नोव्हेंबर, 2024 रोजी हे अधिवेशन सुरू झाले होते. 26 दिवस चाललेल्या या अधिवेशनात लोकसभेच्या 20 आणि राज्यसभेच्या 19 बैठकांचे कामकाज झाले.
या अधिवेशनादरम्यान, लोकसभेत 05 विधेयके मांडण्यात आली. लोकसभेत 4 विधेयके आणि राज्यसभेत 3 विधेयके संमत करण्यात आली.”भारतीय वायुयान विधेयक, 2024″ हे विधेयक या अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी मंजूर केले. विमान कायदा, 1934 मध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांमुळे अंतर्भाव/ वगळणे/रद्द करणे यांसंदर्भात निर्माण झालेली अस्पष्टता दूर करून हा कायदा पुन्हा लागू करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे.
आपल्या देशाने आपल्या संविधानाचा स्वीकार करण्याच्या ऐतिहासिक घटनेचा 75 वा वर्धापन दिन 26 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा केला. उद्देशिका, आपले संविधान जाणून घ्या, संविधानाची निर्मिती आणि त्या दिवशी त्याच्या वैभवाचा गौरव साजरा करणे या चार संकल्पना अंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात 26 नोव्हेंबर 2024 रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, दोन्ही सदनांचे सदस्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींच्या हस्ते एक स्मृती नाणे, टपाल तिकीट आणि “मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया अँड इट्स ग्लोरियस जर्नी” आणि “मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया: ए ग्लीम्स” या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. जगभरातील भारतीय भारताच्या राष्ट्रपतींसोबत उद्देशिका वाचनात सहभागी झाले.
संविधान स्वीकृतीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर चाललेल्या सोहळ्याचा एक भाग म्हणून, 13 आणि 14 डिसेंबर रोजी लोकसभेत आणि 16 आणि 17 डिसेंबर 2024 रोजी राज्यसभेत “भारतीय संविधानाच्या 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास” या विषयावर विशेष चर्चा आयोजित करण्यात आली होती.लोकसभेत ही चर्चा 15 तास 43 मिनिटे चालली ज्यामध्ये 62 सदस्यांनी भाग घेतला आणि त्याला पंतप्रधानांनी उत्तर दिले. राज्यसभेत एकूण 17 तास 41 मिनिटांची चर्चा झाली ज्यामध्ये 80 सदस्यांनी भाग घेतला आणि त्याला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले.
2024-25 च्या अनुदानासाठी पुरवणी मागण्यांच्या पहिल्या भागावर चर्चा झाली आणि त्यावर मतदान झाले संबंधित विनियोजन विधेयक सादर करण्यात आले, चर्चा करण्यात आली आणि सुमारे 7 तास 21 मिनिटांच्या चर्चेनंतर 17-12-2024 रोजी लोकसभेत संमत करण्यात आले.
(i) घटनादुरुस्ती (एकशे एकोणतीसावी) विधेयक, 2024 आणि (ii) केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) विधेयक, 2024 ही दोन ऐतिहासिक विधेयके लोकसभा आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या यंत्रणेला प्रभावी करण्यासाठी “एक राष्ट्र, एक निवडणूक” या संकल्पनेखाली 17 डिसेंबर 2024 रोजी लोकसभेत सादर करण्यात आली आणि 20 डिसेंबर 2024 रोजी संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले.
लोकसभेत सादर करण्यात आलेली, लोकसभा/ राज्यसभेत संमत करण्यात आलेली आणि दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांची यादी परिशिष्टात जोडली आहे.
लोकसभेच्या कामकाजाची उत्पादकता अंदाजे 54.5% आणि राज्यसभेची उत्पादकता 40 %. होती.
परिशिष्ट
18 व्या लोकसभेच्या तिसऱ्या आणि राज्यसभेच्या 266 व्या सत्रात झालेले संसदीय कामकाज
- लोकसभेत सादर झालेली विधेयके
किनारपट्टी नौवहन विधेयक, 2024
मर्चंट शिपिंग विधेयक, 2024
घटनादुरुस्ती( एकशे एकोणतीसावी) विधेयक, 2024
केंद्रशासित प्रदेश कायदा(सुधारणा) विधेयक 2024
विनियोजन विधेयक(क्र. 3), 2024
संसदेच्या सभागृहांची संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आलेली विधेयके
1.घटनादुरुस्ती (एकशे एकोणतीसावी) विधेयक, 2024.
2.केंद्रशासित प्रदेश कायदा(सुधारणा) विधेयक 2024
लोकसभेने संमत केलेली विधेयके
बँकिंग कायदे(सुधारणा) विधेयक, 2024
रेल्वे(सुधारणा) विधेयक, 2024
आपत्ती व्यवस्थापन(सुधारणा) विधेयक, 2024
विनियोजन(क्र.3) विधेयक, 2024
राज्यसभेने संमत केलेली विधेयके
तेलक्षेत्र(नियमन आणि विकास) सुधारणा विधेयक, 2024
भारतीय वायुयान विधेयक, 2024
बॉयलर्स विधेयक, 2024
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेली विधेयके
भारतीय वायुयान विधेयक, 2024