नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली.
तत्कालिन महसूल राज्यमंत्री यांनी २९ जुलै २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर सावरगाव येथील गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली आहे. सातत्याने या घटना घडत आहेत. ज्यावेळी मंत्री पदाची शपथ घेऊन मंत्री कामाला सुरुवात करतात त्यावेळी या घटना घडणे योग्य नाही असेही अजित पवार म्हणाले.
गायरान जमीनीबाबत वेगळ्या प्रकारचे आदेश असताना पण या जमीनीचे वाटप करण्यात आले आहे. शांताबाई जाधव यांच्या अर्जावर वाशिम जिल्हाधिकारी यांनी १७ मे २०१८ रोजी दिलेला आदेश तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी रद्द केला. जिल्हाधिकारी यांनी वस्तुस्थिती तपासली नाही असा चुकीचा अभिप्राय दिला गेला आहे. एक महिन्याच्या आत पाच एकर जागा नियमित करावी असे लेखी आदेश दिले आहेत. हे नियमाला धरुन नाही. नियमबाह्य जमीनीचे वाटप झाले आहे. कदाचित आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही असा थेट आरोपही अजित पवार यांनी केला.
अशी प्रकरणे सातत्याने समोर येत असून या सर्वप्रकरणी महसूल राज्यमंत्र्यांनी दलालांमार्फत संधान साधून जमीन वाटपाची कारवाई केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व प्रकरणातील कागदपत्रे माझ्याकडे आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले. या जमीनी प्रकरणी वेगवेगळ्या ऑर्डर निघाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून चौकशी होईपर्यंत सबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे त्यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून राहू नये अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
तत्कालीन महसूल राज्यमंत्री व विद्यमान मंत्री यांनी वाशीम जिल्ह्यातील मंग्रुलपीर तालुक्याच्या सावरगाव येथे गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली.ज्यावेळेस मंत्री महोदय मंत्री पदाची शपथ घेऊन कामाला सुरुवात करतात,त्यावेळेस अशा घटना घडणं योग्य नाही.#हिवाळीअधिवेशन२०२२ pic.twitter.com/J3gLqS1GFZ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 29, 2022