इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ताजमहाल हे जगभरात प्रेमाचे प्रतीक मानले जाते. या संगमरवरी वास्तू तथा इमारतीच्या सौंदर्याची जगभरात प्रशंसा केली जाते. मात्र या इमारतीच्या आजूबाजूच्या पाच गावातील ग्रामस्थ या वास्तूला शापापेक्षा कमी मानत नाहीत. खरे तर ताजमहालची सुरक्षा वाढवल्यामुळे या गावकऱ्यांच्या अडचणी खूप वाढल्या आहेत. त्यामुळे या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरी ना नातेवाइकांना येणे शक्य आहे, ना गावातील तरुणांसाठी लग्नाचे स्थळ येत आहे. त्यामुळे या गावांतील 40 टक्के तरुण अद्यापही बिन लग्नाचे राहिले आहेत.
ताजमहालाला शाप देणारी ही गावे म्हणजे गढ़ी बांगस, नागला पायमा, तालफी नागला, अहमद बुखारी आणि नागला धिंग, ज्यांचा मार्ग ताजमहालाच्या बाजूला जातो. सन 1992 पासून या ग्रामस्थांचा त्रास वाढला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताजमहालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या गावांमध्ये जाणाऱ्या व्यक्तीला प्रशासनाकडून ‘पास’ घेणे आवश्यक आहे. गावातील लोकांकडे आधीच ‘पास’ आहे, परंतु त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येक वेळी गावात आल्यावर नवीन पास काढावा लागतो.
ताजमहालपासून या गावांकडे जाणाऱ्या मार्गावर ‘चेक पॉइंट’ बनवण्यात आले आहेत. त्यांच्या घरी आलेल्या नातेवाईकाला इथे बोलावले जाते. त्यानंतरच त्यांना गावात प्रवेश दिला जातो. या ग्रामस्थांच्या नातेवाईकांना कोणत्याही शुभ कार्यक्रमाला जाता येत नाही. एवढेच नाही तर लग्नपत्रिका देण्यासाठी आणि तरुणांच्या लग्नासाठीही नागरिक येथे पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे या गावांतील 40 ते 45 टक्के तरुण बॅचलर म्हणून उरले आहेत. 1992 मध्ये ताजमहाल सर्वोच्च न्यायालयाने निगराणीखाली घेतल्यानंतर, या गावांतील नागरिकांना शहरात जाण्यासाठी दसरा घाटाजवळील नागला पायमा पोलीस चौकीतून जावे लागते. तसेच 10 किमी चालत जावे लागते आणि धंदुपुरातून जावे लागते. या गावांच्या वाटेवर सकाळ-संध्याकाळ थोडा वेळ बॅटरी रिक्षा दररोज चालविण्यास परवानगी दिली जाते.
या गावातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास, एखादी महिला गरोदर राहिल्यास अडचण वाढते. अशा स्थितीत केवळ सरकारी रुग्णवाहिका येथे पोहोचू शकते. याशिवाय महिन्यातील पाच दिवस रात्री ताजमहाल पाहण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव या ग्रामस्थांना घरातच कैद राहावे लागते. ताजमहाल पाहण्यासाठी व्हीआयपी पाहुणे आल्यावरही घरांमध्ये कैद होण्याची परिस्थिती निर्माण होते. गेली तीन दशके अशा परिस्थितीचा सामना करत असलेल्या या गावांतील नागरिकांना आता ही ताजमहालसारखी इमारत आपल्या जवळ नको वाटते. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, या समस्येला कंटाळलेल्या या गावांतील काही नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.