दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जऊळके दिंडोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारती जोंधळे तर उपसरपंचपदी तुकाराम जोंधळे यांची निवड करण्यात आली आहे. हा निकाल संपूर्ण राज्यातच ऐतिहासिक ठरला आहे. कारण, सरपंच झालेल्या पत्नीने दोनदा निर्णायक मत दिल्याने पती उपसरपंच झाला आहे. त्यामुळे त्याची राज्यभरात चर्चा होत आहे.
ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट सरपंचपदी सौ भारती तुकाराम जोंधळे यांची अगोदरच निवड झाली होती. तर तुकाराम जोंधळे यांच्या गटाचे चार सदस्य तर विरोधी शांताराम जोंधळे यांच्या गटाचे ५ सदस्य निवडून आले. आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शासकीय अध्यादेशानुसार, थेट निवडून आलेल्या सरपंचाला पहिल्या फेरीत एक व समसमान मते झाल्यावर निर्णायक मत देण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या अध्यादेशाचा तुकाराम जोंधळे गटाला लाभ झाला.
सरपंच या नात्याने भारती यांनी त्यांचे मत आपले पती तुकाराम जोंधळे यांना दिले. त्यामुळे तुकाराम जोंधळे आणि शांताराम जोंधळे या दोन्ही गटाचे प्रत्येकी ५ सदस्य झाले. त्यामुळे ही समसमान मते लक्षात घेता सरपंचांनी पुन्हा मत देण्याचा अधिकार वापरला. याही वेळी भारती यांनी त्यांचे पती तुकाराम यांनाच मत दिले. त्यामुळे पत्नी सरपंच तर पती उपसरपंच असा योग जुळून आला आहे. या सर्व प्रक्रियेत सरपंच सौ. भारती यांचे मत निर्णायक ठरले आहे. निवडीनंतर तुकाराम जोंधळे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. निवडणुकी प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अंबाबाई बागुल, अरुणा वाघ, कुणाल बागुल, खंडू गोतरणे, आशा गांगुर्डे, उषा जोंधळे, रूपाली उजे, ग्रामसेवक हिरालाल पाटील आदी उपस्थित होते.
Historic Result Husband Wife Win in Grampanchayat Election
Sarpanch Upsarpancha Jaulke Dindori