इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अमेरिकेच्या शल्यचिकित्सांनी एका ५७ वर्षी व्यक्तीमध्ये जनुकीय सुधारित (जेनेटिकली मॉडिफाइड) डुकराचे हृदय यशस्वीरित्या प्रत्यारोपित केले आहे. वैद्यकीय इतिहासात अशी घटना प्रथमच घडली आहे. त्यामुळे आगामी काळात अवयवांची कमतरता भासल्यास अशा स्वरूपाची शस्त्रक्रिया करता येणार आहे. ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया शुक्रवारी करण्यात आल्याची माहिती युनिव्हर्सिटी ऑफ मॅरीलँड मेडिकल स्कूलने दिली.
या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या आजारावरील उपचाराबद्दल अद्याप अनिश्चितता असली तरी प्राण्यांचे अवयव माणसाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्याची शस्त्रक्रिया मैलाचा दगड निश्चित मानला जाऊ शकतो.
डेव्हिड बेनेट नावाच्या एका रुग्णाला अनेक आजारांनी ग्रासले होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्या शरीरात माणसाचे हृदय प्रत्यारोपित केले जाऊ शकत नव्हते. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डुकराचे हृदय त्यांच्या शरीरात योग्यरित्या काम करत आहे का नाही यावर डॉक्टर बारीक लक्ष ठेवून आहेत.
मॅरीलँड येथील रहिवासी डेव्हिड सांगतात, प्रत्यारोप शस्त्रक्रिया करावी किंवा मृत्यू स्वीकारावा असे माझ्याजवळ दोन पर्याय होते. मला जगायची इच्छा आहे. ही शस्त्रक्रिया म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखे आहे, हे मी जाणतो. बरे झाल्यानंतर बेडच्या खाली उतरण्यासाठी मी उत्सुक आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते हृदय-फुफ्फुस बायपास मशिनच्या आधारावर खाटेवर पडून होते.
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अमेरिकेच्या खाद्य आणि औषधी प्रशासनाने पारंपरिक प्रत्यारोपण न होऊ शकल्याने शेवटचा प्रयत्न म्हणून या प्रत्यारोप शस्त्रक्रियेला मंजुरी दिली होती. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून डुकराचे हृदय प्रत्यारोपित करणारे डॉ. बार्टले ग्रिफिथ सांगतात, ही एक यशस्वी शस्त्रक्रिया होती. अवयवांच्या तुटवड्यामुळे निर्माण होणारे संकट कमी करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरले आहे.