वॉशिंग्टन (अमेरिका) – सूर्यमालेतील रहस्याला जाणून घेण्याच्या दिशेने वैज्ञानिकांनी नवे यश मिळवले आहे. नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या पार्कर या अंतराळयानाने सूर्याला स्पर्श केला आहे. या अंतराळयानाने २८ एप्रिल रोजी सूर्याच्या वातावरणाचा बाहेरील भाग म्हणजेच कोरोनामध्ये प्रवेश केला होता. आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर नासाने याची माहिती जाहीर केली आहे.
सूर्य हा सूर्यमालेतील ऊर्जेचा स्रोत आहे. परंतु आतापर्यंत वैज्ञानिकांना सूर्याबद्दल विशेष काही माहिती मिळालेली नव्हती. सूर्याच्या पृष्ठभागावरील चमक आणि त्याच्या चारही बाजूने असलेले चुंबकीय क्षेत्र वैज्ञानिकांना मर्यादित करत होते. याच आव्हानांचा पाठलाग करताना पार्कर अंतराळयान त्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. सूर्याच्या कोरोनामध्ये पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू आहे. या प्रवासात पार्कर अनेक वेळा कोरोनावरून जाणार आहे. या क्रमाने गेल्यास पार्कर २०२५ मध्ये सूर्यापासून ६१.६ लाख किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. सूर्यापासून हे यान सर्वात जवळ असणार आहे. पार्करद्वारे मिळणार्या माहितीवरून सूर्याबद्दलच्या अनेक रहस्यावरून पडदा उठणार आहे. नासाने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पार्करला १२ ऑगस्ट २०१८ रोजी अंतराळात सोडले होते.
पार्कर हे अंतराळयान नासाच्या लिव्हिंग विथ अ स्थार या कार्यक्रमाचा भाग आहे. त्याच्या माध्यमातून नासाने सूर्य आणि पृथ्वीमधील यंत्रणेतील विविध बाजू समजून घेण्याचे तसेच त्याची माहिती गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, पार्कर प्रोब कडून जी काही माहिती मिळेल, त्यातून सूर्याबद्दलची आमची माहिती विकसित होणार आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितले, की हे अंतराळयान पूर्वीपेक्षा खूपच सूर्याच्या जवळ गेले आहे. ते कोरोना नावाच्या वातावरणात प्रवेश करत आहे. पृथ्वीपासून १५ कोटी किलोमीटर प्रवासानंतर मंगळवारी अमेरिकी भूभौतिकीय संघाच्या बैठकीत यानाने सूर्याच्या बाहेरी भागास स्पर्श करण्यासह पहिला संपर्क केल्याची घोषणा करण्यात आली.
सूर्याला स्पर्श करणे कसे शक्य
हे ऐतिहासिक यश मिळविण्यास नासाच्या वैज्ञानिकांसह अभियंत्यांच्या पथकाचा हातभार लागला आहे. यामध्ये हॉर्वर्ड आणि स्मिथसोनियनच्या सेंटर फॉर एस्ट्रोफिजिक्सच्या सदस्यांचा समावेश आहे. हे पथक प्रोबमध्ये लावण्यात आलेल्या सोलार प्रोब कप या सर्वात महत्त्वाच्या उपकरणावर देखरेख ठेवण्याचे काम करत आहे. सूर्याच्या वातावरणातील कणांना एकत्रित करण्याचे काम सोलार प्रोब कप करत आहे. हे अंतराळयान सूर्याच्या वातावरणा बाहेरील कोरोनापर्यंत पोहोचण्यास यशस्वी झाल्याचे याच सोलार प्रोब कपमुळे कळण्यास मदत झाली आहे. पार्करच्या कपमध्ये एकत्रित केलेल्या डेटावरून असे समजले की पार्करने २८ एप्रिल रोजी सूर्याच्या वातावरणाच्या बाहेरील पृष्ठभागाला तीन वेळा पार केले आहे. एका वेळी तर कमीत कमी पाच तास हे काम केले आहे.
११ लाख अंश सेल्सियअस तापमान कसे पार केले
सूर्याच्या वातावरणाला कोरोना म्हटले जाते. त्याचे तापमान जवळपास ११ लाख अंश सेल्सिअस आहे. इतक्या उष्ण तापमानात पृथ्वीवरील कोणतीही वस्तू काही सेकंदात वितळू शकते. त्यामुळे वैज्ञानिकांनी अंतराळयानात विशेष तंत्रज्ञान असलेले हिट शिल्ड्स लावण्यात आल्या आहेत. या शिल्ड्स लाखो अंशाचे तापमान असलेल्या सूर्याच्या तापमानातून वाचवतात. याबद्दल १४ डिसेंबरला नासाने पत्रकार परिषदेत सांगितले होते, की त्यांचे यान सूर्याच्या कोरोनामध्ये प्रवेश करण्यास यशस्वी झाले आहे. सध्या सूर्यापासून ते ७९ लाख किलोमीटर दूर आहे. परंतु पार्करला सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचण्यासाठी अजून चार वर्षांची वाट पाहावी लागणार आहे.