नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. अशा पुरातन वास्तूंच्या ठिकाणी कोणी इसम मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यास महराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे नाशिकचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी कळविले आहे.
उपरोक्त कायद्यान्वये पहिल्या अपराधास ६ महिन्यांपर्यंत सश्रम कारावासाची आणि रूपये १० हजार पर्यंत दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतरच्या अपराधास वाढीव शिक्षेची तरतूद आहे. गड, किल्ले या ठिकाणी व्यक्ती मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागतांना आढळल्यास नागरिकांनी नाशिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला कळवावे. त्यासाठी ०२५३-२५८१०३३ या दूरध्वनी क्रमाकांवर तसेच आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर आणि ८४२२००११३३ या व्हॉट्ॲप क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक श्री. गर्जे यांनी केले आहे.