विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्याच्या लाचखोरीच्या इतिहासातील सर्वात मोठा महामेरु समोर आला आहे. अवघ्या १०-१५ रुपयांची लाच घेणारेही महाभाग आपल्याकडे आहेत. मात्र, हा महामेरु नगररचना विभागात कार्यरत होता. त्याने थोडथोडके नव्हे तर तब्बल ३४ वर्षे तो या विभागात माया जमवत होता. त्याच्याविषयी प्रचंड तक्रारी येत होत्या. अखेर लाचलुचपत विभागाने (एसीबी) त्याच्यावर धाड टाकली. त्याच्या चौकशीत जे समोर आले आहे ते राज्यात इतिहास घडविणारेच असल्याचे स्पष्ट होत आहे. या महाभागाचे नाव आहे हनुमंत नाझिरकर. अमरावतीच्या नगररचना विभागात तो सहसंचालक या पदावर कार्यरत होता. १९८६ ते २०२० या ३४ वर्षांची कारकीर्द त्याने ऐतिहासिकच बनवली आहे. कारण, या काळात त्याने तब्बल ८२ कोटींपेक्षा अधिक रक्कम लाचखोरातून जमविल्याचे एसीबीच्या चौकशीत समोर आले आहे. या मोठ्या कामगिरीची दखल घेऊन एसीबीने न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले असून ते सुद्धा ४० हजार पानांचे आहे. त्याच्या नावे ८ कंपन्या, २० बेनामी मालमत्ता आणि ११६२ टक्के अधिक मालमत्ता आढळून आली आहे. आपल्या कुटुंबियांच्या नावे या मालमत्ता नाझिरकरने खरेदी केल्याचे एसीबीच्या तपासात स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षापासून एसीबीचा हा तपास सुरू होता. त्यामुळे न्यायालय आता काय निकाल देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.