मुंबई – महालांमधील आणि गड-किल्ल्यांवरील विहीरी बघून आपण कायम आश्चर्य व्यक्त करीत असतो. विशेषतः भारतात उंचावर बांधलेल्या विहीरी किंवा शेकडो पायऱ्या असलेल्या विहीरी जगभरातील पर्यटकांसाठी आश्चर्याची बाब ठरत आल्या आहेत. अर्थात पायऱ्या असलेल्या विहीरींना बावडी असे म्हटले जाते. अशाच एका बावडीचा ९०० वर्षांचा इतिहास आपण आज जाणून घेऊया.
जुन्या काळात राजे-महाराजे आपल्या महालांमध्येच विहीरी खोदून घ्यायचे. जेणेकरून कितीही दुष्काळ आला तरीही महालात पाण्याची कमतरता भासू नये. गुजरातच्या पाटणमध्ये असलेली ‘रानी की बावडी’ देखील अश्याच एका इतिहासाची साक्षीदार आहे. ही बावडी बघण्यासाठी जगभरातील पर्यटक गर्दी करतात.
२०१४ मध्ये युनेस्कोने या बावडीला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले होते. या बावडीला ‘रानी की वाव’ देखील म्हटले जाते. हिचे बांधकाम इसवी सन १०६३ मध्ये सोलंकी राजवंशाचे राजा भीमदेवच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त करण्यात आले होते. त्यांची पत्नी राणी उदयामतीने हे बांधकाम करून घेतले होते. राणी उदयामती ही जुनागडचे चुडासमा शासक खेंगारची सुपुत्री होती.
असा आहे आकार
रानी की बावडी ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल आहे. या बावडीच्या भिंतींवर आणि खांबांवर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. बहुतांश मूर्ती या राम, वामन, नरसिंहा, महिषासूरमर्दिनी, कलकी आदी अवतारांच्या आहेत. संपूर्ण नक्षीकाम हे विष्णूला समर्पित आहे. विशेष म्हणजे ही बावडी सात मजली मारु-गुर्जर वास्तू शैलीमध्ये तयार करण्यात आली आहे.
असा लागला शोध
सातव्या शतकापर्यंत सरस्वती नदीसोबत ही बावडीदेखील बेपत्ता झाली होती. पुरातत्व विभागाने तिचा पुन्हा शोध लावली आणि साफ-सफाई केली. आता इथे लोक मोठ्या संख्येने फिरायला येतात. या बावडीच्या खाली एक छोटे दार आहे आणि त्यात ३० किलोमीटर लांब सुरंग बनलेला आहे, अशीही मान्यता आहे. हा सुरंग पाटणच्या सिद्धपूरमध्ये जाऊन उघडतो, असेही लोक सांगतात.