नवी दिल्ली – दुबईत पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकातील सामने सुरू असताना महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषकात पात्रता फेरीत महिला खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पात्रता फेरीच्या सामन्यात एका महिला गोलंदाजाने शेवटच्या षटकात सलग पाच चेंडूत पाच फलंदाज बाद केल्याचा पराक्रम केला आहे. यासोबतच तिने हॅट्ट्रिकही साधली आहे. त्यामुळे विरोधी संघाला हा सामना एका धावेने गमवावा लागला आहे.
होय, आम्ही तुम्हाला ब्राझील आणि कॅनडादरम्यान झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमधील पात्रता फेरीच्या सामन्याबद्दलच सांगत आहोत. ब्राझीलच्या लॉरा कार्डोसोने हिने एकाच षटकात पाच चेंडूंवर पाच गडी बाद करून इतिहास रचला. पावसामुळे वीस षटकांचा सामना १७ षटकांचा खेळविण्यात आला. ब्राझील संघाने प्रथम फलंदाजी करत ७ गडी बाद ४८ धावा केल्या. ब्राझीलची कर्णधार रॉबर्टा एव्हरीने सर्वाधिक २१ धावा केल्या. इतर फलंदाजांनी मात्र नांगी टाकली. कॅनडाच्या संघातील शमसादने चार षटकात आठ धावा देत ३ गडी बाद केले. अजमतने ११ धावात २ गडी बाद केले.
४९ धावांचा पाठलाग करताना कॅनडाची सुरुवातही अडखळत झाली. कॅनडाच्या मुखविंदर गिल हिला सर्वाधिक १९ धावा करता आल्या. १५ षटकांत पाच बाद ४६ धावा अशी कॅनडाची अवस्था होती. शेवटच्या षटकात कॅनडाला विजयासाठी ३ धावांची गरज होती आणि ५ गडी शिल्लक होते. सामना रंगतदार अवस्थेत आला असताना शेवटचे षटक लॉरा कार्डोसोने टाकले. मुखलविंदर गिलला पहिल्या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. दुसर्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात कपाडिया धावबाद झाली. तिसर्या चेंडूवर हाला अजमत आणि चौथ्या चेंडूवर शमशाद बाद झाली. पाचव्या चेंडूवर सना जफरने ब्राझीलची कर्णधार रॉबर्टा अवारीचा झेल घेतला. अशा प्रकारे लॉराची हॅट्ट्रिक झाली. अखेरच्या चेंडूवर मुखविंद गिल दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाली. ब्राझीलने हरलेला सामना एका धावेने जिंकला आणि इतिहास रचला.