नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील विधिमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी, यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार श्रीमती अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
नोकरदार महिलांना त्यांच्या लहान मुलांची काळजी, स्तनपान करता यावे, याकरिता कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष आहेत. अधिवेशनादरम्यान आमदार श्रीमती अहिरे यांना त्यांच्या बाळाची काळजी घेता यावी यासाठी नागपूर येथील विधिमंडळाच्या विस्तारित इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याचे कामकाज केले जात असून याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधा आहेत.
अधिवेशनासाठी बाळासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे कर्तृत्व आणि मातृत्वाचा सन्मान करीत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले होते. आज हिरकणी कक्षाचे उद्घाटन देखील आमदार श्रीमती अहिरे यांच्या हस्ते करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार सकाळी हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
Hirkani Section in Nagpur Assembly for Women MLA
NCP Saroj Ahire