मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरीचे आमदार आणि आदिवासी समाजाचे नेते हिरामण खोसकर यांनी सोमवारी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थितीत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आमदार खोसकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चालवलेल्या कामांची व लोकोपयोगी योजनांची ही पोचपावती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात मी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो असे त्यांनी सांगितले.
हे आहे कारण
इगतपुरी विधानसभा मतदार संघातून हिरामण खोसकर हे काँग्रेस पक्षाकडून निवडून गेले होते. त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॅास व्होटिंग केले असा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे यावेळेस त्यांना काँग्रेस तिकीट देईल का याबाबत साशंकता होती. त्यामुळे त्यांनी महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची निवड करत प्रवेश केला. आमदार होण्याअगोदर खोसकर हे राष्ट्रवादीतच होते. त्यांनी जिल्हा परिषद सदस्यपदही राष्ट्रवादीच्या चिन्हावर मिळवले होते. पण, इगतपुरी विधानसभा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे त्यांनी काँगेस पक्षात प्रवेश केला. आता त्यांनी पुन्हा घरवापसी केली. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस बरोबरच शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. हा मतदार संघ शिंदे गट लढवण्याच्या तयारीत होता.