हिंगोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंगोलीच्या वाट्याला आलेला आनंद सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. कारण आता संपूर्ण ब्रम्हांडाचा वेध हिंगोलीतून घेतला जाणार आहे.
गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या दोन प्रयोगशाळा अमेरिकेत अस्तित्वात आहेत. नासाकडून त्यांचे परिचालन होते. आता जगातील तिसरी प्रयोगशाळा अंजनवाडा- दुधाळा परिसरात उभारली जाणार आहे. आयुकाचे शास्त्रज्ञ व नासाशी संबंधित अधिकारी या ठिकाणी अनेकदा भेटी देऊन गेले आहेत. जगातील तिसरी वेधशाळा हिंगोलीच्या वाट्याला आल्याने स्थानिकांमध्ये आणि सुशिक्षित नागरिकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी – दुधाळा परिसरात गुरुत्वीय लहरींच्या सूक्ष्म अभ्यासासाठी होणाऱ्या या प्रयोगशाळेला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या लिंबाळा मक्ता भागात या ठिकाणी काम करणाऱ्या शास्त्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांसाठी वसाहत उभी केली जात आहे. या वसाहतीच्या कामालाही प्रारंभी झाला आहे. वसाहत व रस्त्यांसाठी जमीन भूसंपादन प्रक्रियाही पार पडली आहे.
२ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद
या प्रकल्पाला २०१६ मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेझर इंटरफेरोमीटर ग्रेव्हिटेशनल-वेव्ह ऑब्जर्वेटरी प्रकल्पासाठी २२५ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली होती. ही जमीन २०२१ मध्ये प्रकल्पाला हस्तांतरितही करण्यात आली होती. मात्र, या प्रयोगशाळेच्या मुख्य कामाला सुरुवात होण्यासाठी केंद्र शासनाकडून मंजुरी मिळणे गरजेचे होते. आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रयोगशाळेला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी तब्बल दाेन हजार ६०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
जगाला होणार फायदा
लिगो इंडिया प्रयोगशाळेच्या विकासाच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याला फायदा होणार आहे. तर संशोधनाच्या दृष्टीतून जगाला फायदा होणार आहे. प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या रोजगारांच्या मोठ्या संधीही उपलब्ध होतील, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. तर अमेरिका व या वेधशाळेच्या संदर्भातील शास्त्रज्ञांच्या भेटीगाठी वाढणार असल्याची माहिती आयुकाचे शास्त्रज्ञ प्रोफेसर संजित मित्रा यांनी दिली.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1644014747816431616?s=20
Hingoli Ligo Laser Interferometer Gravitational Wave Observatory