झांशी (उत्तर प्रदेश) – संकटात आणि दुःख देखील धावून येतोच खरा मित्र असे म्हटले जाते. संकटात खरा मित्र मदतीला धावून आल्याची अशीच एक घटना घडली. बांदा जिल्ह्यातील बिसांडा परिसरातील एका हिंदू मित्राने जिवाची पर्वा न करता मुस्लिम युवकाच्या तरुण बहिणीची सुटका केली. त्यासाठी त्याने सुमारे २३० किलोमीटर रेल्वेचा पाठलाग केला. अखेर झांशी येथे रेल्वे पोलिसांच्या मदतीने अपहृत बहिणीची सुटका केली. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. मात्र, हा प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने त्यास वाचा फुटली.
बिसंडा परिसरातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षाच्या मुलीला गावातील तरुणांनी पळवून नेले. त्यापुर्वी बांदा रेल्वे स्थानकातून तुळशी एक्स्प्रेस मध्ये ती मुलगी चढली. यानंतर या मुलीचे चार तरुणांच्या टोळीने अपहरण केले. ते चारही तरुण तिला मुंबईला घेऊन जात होते. बेपत्ता झालेल्या बहिणीची माहिती मिळताच तिच्या तरूण भावाने आपल्या मित्राला या घटनेची माहिती दिली. मित्राच्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी अखेर मित्राने आपल्या जीवाची बाजी लावली.
खूप शोध घेताना त्याला कळाले की, मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या तुळशी एक्स्प्रेस या रेल्वेतून बहिणीच्या अपहरण झाले. तसेच फोनवर चर्चेदरम्यान तिचे फोटो देखील व्हॉट्सअॅपवर पाठविले होते. त्याच वेळी काही लोकांच्या मदतीने ट्रेनचे सर्व डबे तपासण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी कळाले की, ट्रेनमधील कोच नंबर तीनमध्ये चार तरुण हे मित्राच्या बहिणीभोवती बसले आहेत. अशी माहिती मिळाल्यावर त्या हिंदू मित्राने त्याच्या नातेवाईकाची कार घेतली आणि रेल्वेचा पाठलाग सुरु केला. सुसाट सुमारे २३० किमी प्रवास करत मौरानीपूर रेल्वे स्थानक गाठले. मात्र रेल्वे झांशीकडे रवाना झाली होती.
त्यानंतर त्याने झांशी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि त्या मुलीचा फोटो पाठविला. या माहितीच्या आधारे झांशी रेल्वे स्थानकावर पोलिसांनी रेल्वे कोचला घेराव घातला. त्या तरुणीची गुंडांच्या ताब्यातून सुटका केली. मात्र, तिचे अपहरण करणारे आरोपी फरार झाले. मात्र, पोलिसांनी त्या चार संशयितांना घेतले खरे पण दुसर्याच दिवशी कारवाई न करता सोडले. त्यामुळे निराश झाल्याने पीडितेच्या भावाने सोशल मिडीयावर ही घटना व्हायरल केली.