मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बीड जिल्ह्यातील देवस्थानाच्या इनामी जमिनीबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरु असून याचा तपास लवकर करावा अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
आष्टी तालुक्यातील देवस्थानाच्या इनामी जमिनीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सर्वश्री जयंत पाटील, रईस शेख, आशिष शेलार, नाना पटोले, दिलीप वळसे-पाटील, प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या प्रकरणी मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास पुढील कार्यवाहीबाबत आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढली असल्याने तपास पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. हा तपास लवकर पूर्ण करावा अशा सूचना संबंधित विभागाला देऊन दोषींवर कार्यवाही करण्यात येईल आणि देवस्थानाच्या जमिनी परत देवस्थानाला देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते मात्र उलट सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अयोग्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना सभागृहात घेरले आणि हा महत्वाचा मुद्दा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथे अनेक हिंदू देवस्थानांच्या ट्रस्टच्या जमीनी हडप करण्याचा प्रकार घडला असल्याचे आज प्रश्नोत्तराच्या तासात जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.हिंदू देवस्थान जमीनीच्या या प्रकरणाचा तपास एसीबी करत आहे मात्र एसीबीकडून चालढकल होत आहे. गुन्हेगाराला अटक करण्यात आली नाही. हिंदू देवस्थानच्या जमिनी हडप करणे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जमिनी हडप करणारे कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. लवकरात लवकर देवस्थानांना जमिनी परत करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीही जयंत पाटील यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर ते किती शीघ्रगतीने काम करू शकतात हे याच प्रकरणातून दिसते. विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी १८ ऑगस्ट२०२२ ला तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली आणि १९ ऑगस्ट २०२२ ला नव्या अधिकाऱ्याची तिथे नेमणूक झाली. जलद काम करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचे कौतुक असा चिमटा काढतानाच पण तपासही लवकर पूर्ण करा व दोषींना शासन करा असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. दरम्यान हा प्रकार गंभीर असून यावर निश्चितपणे कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात दिले.
https://www.facebook.com/watch/?v=6354175481273734
Hindu Trust Land Fraud Issue Assembly Session