बंगळुरू – राजकीय नेते नेहमीच वादग्रस्त विधान करून वादंग निर्माण करतात. हिंदू महासभेच्या एका नेत्याने शनिवारी कर्नाटकमध्ये असेच एक वादग्रस्त विधान केले. या नेत्याने म्हटले आहे की, हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी आम्ही गांधींनाही सोडले नाही. तसेच जोपर्यंत हिंदू महासभा आहे, तोपर्यंत कोणतेही हिंदू मंदिर पाडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
हिंदू महासभेच्या धर्मेंद्र या नेत्याने कर्नाटक मधील मंदिर प्रश्नी मंगळुरूमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हे वादग्रस्त वक्तव्य केले. हिंदू महासभेच्या या नेत्याने भाजप सरकारच्या नेत्यांना खुले आव्हान दिले आहे. धर्मेंद्र पुढे म्हणाले की, सरकारने चित्रदुर्ग, दक्षिण कन्नड आणि म्हैसूरमधील मंदिरे पाडली आहेत. सध्या सरकार कोण चालवत आहे? जर असे काँग्रेसच्या कार्यकाळात घडले असते, तर काय झाले असते?
हिंदू महासभेचा हा नेता पुढे म्हणाला की, आमचे संविधान समानतेच्या अधिकाराबद्दल बोलते, तर येथे फक्त हिंदूंनाच का लक्ष्य केले जात आहे? त्याचवेळी, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कर्नाटक सरकारने म्हंटले की, मंदिर पाडण्याच्या म्हैसूर जिल्हा प्रशासनाच्या योजनेची माहिती नाही. सरकारने या बाबत योग्य कारवाई केली जाईल, असेही म्हटले आहे.