इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी उद्योग समूहाचे झालेले हाल संपूर्ण जगाने बघितले. हिंडेनबर्गने थेट अदानींच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये तर अदानींचे तीन तेरा वाजलेच शिवाय इतर उद्योगही संकटात आले. त्यातून अद्याप अदानी समूह सावरलेला नसताना हिंडेनबर्गने आणखी एक गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे.
हिंडेनबर्गचे नाव घेतले तरी मोठमोठ्या कंपन्यांचे धाबे दणाणतील, अशी अवस्था सध्या अदानींची झाली आहे. अश्यात हिंडेनबर्गने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लवकरच एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे हिंडेनबर्गचा इशारा पुन्हा अदानींसाठीच आहे की आणखी कुठल्या कंपनीसाठी, हे अद्याप कळू शकलेले नाही. शिवाय ही कंपनी भारतातील आहे की बाहेरची याबाबतही स्पष्टता नाही. हिंडेनबर्गच्या या अहवालावर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी ‘आशा आहे की यावेळी भारतीय कंपनीचे नाव नसेल. बदल म्हणून एखादी चायनिज कंपनी बघा,’ असा सल्ला एकाने हिंडेनबर्गला दिला आहे. तर काहींनी ‘यावेळी एक अमेरिकन कंपनी असेल, आणि त्या कंपनीचा प्रमुख भारतीय असेल’, असा अंदाजही वर्तवला आहे.
मध्यरात्रीच्या ट्विटने खळबळ
हिंडेनबर्ग रिसर्चने भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीडच्या सुमारास आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं. त्यात आणखी एक नवा अहवाल जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘नवीन अहवाल लवकरच… आणखी एक मोठा खुलासा’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अदानींचे हाल
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांचे हाल झाले. त्यांचे शेअर्स तर झपाट्याने खाली आलेच, शिवाय जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीतूनही गौतम अदानी यांची गच्छंती झाली. आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमधून अदानी समूहाला डीलिस्ट करण्यात आले. अदानी समूह अद्याप संकटातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.
New report soon—another big one.
— Hindenburg Research (@HindenburgRes) March 22, 2023
Hindenburg New Research Report Soon Threat