इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एकीकडे महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पुरेशा पावसाची आवश्यकता असताना दुसरीकडे उत्तर भारतात मात्र पावसाने कहर केला आहे. विशेषतः हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाबरोबरच भूस्खलनाच्या घटना घडत असून मोठमोठ्या उंच इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळत असून मलब्यामध्ये वाहून जात आहेत. याची केंद्र सरकार व राज्य सरकारने गंभीर दखल घेत नागरिकांच्या मदत आणि बचाव कार्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पावसाचा तडाखा व भूस्खलनाचे वाढते प्रकार पाहता हिमाचल सरकारने डोंगर उतारावर असलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांना अन्यत्र भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. यादरम्यान कुलू जिल्ह्यात अनी भागात सकाळी धोकादायक ठरलेल्या डोंगर उतारावर असलेल्या आठ इमारती पाहता पाहता जमीनदोस्त झाल्या.
अतिवृष्टीचा हाहाकार
हिमाचलमधील बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळत असून प्रामुख्याने पालमपूर येथे आजही पावसाची नोंद झाली. बुधवार सायंकाळपासून ते आजपर्यंत १३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आता ऑगस्ट महिन्यांत पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनेत १२० जणांचा मृत्यू झाला. एकूण २३८ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण अद्याप बेपत्ता आहेत. याशिवाय राज्यभरातील ७०९ रस्ते बंद आहेत. मिनिटात ढासळलेल्या इमारतींमुळे परिसरात धुळ पसरली आणि मातीचे ढिगारे उभे राहिले. सुदैवाने काही दिवसांपूर्वीच या इमारती रिकाम्या केल्याने जीवितहानी झाली नाही. अनी भागातील कोसळलेल्या इमारतीत दुकाने, बँका आणि अन्य व्यावसायिक प्रतिष्ठानांचा समावेश होता.
कुलूच्या नव्या बसस्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्ग-३०५ जवळ असलेल्या काही इमारतींना भेगा पडल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने नोटिसा बजावून रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरित केले होते. आज सकाळी एकानंतर एक अशा आठ इमारती कोसळल्या. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळ पसरली. अग्निशमन आणि बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगारे बाजला करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी स्वतः लक्ष घालून मदत आणि बचाव कार्यासाठी तसेच नागरिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत, आतापर्यंत राज्य सरकारने १६५.२२ कोटी रुपयांचे वाटप केले आहेत. यातील निधी हा पूल, रस्ते आणि घराच्या डागडुजीसाठी वापरला जात आहे.
१२२ वर्षाचा विक्रम मोडला
हिमाचल प्रदेशात सातत्याने पाऊस कोसळत असून सिमल्यात आतापर्यंत २०१७ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसाने १२२ वर्षाचा विक्रम मोडला आहे. मंडी, सिमला आणि सोलन येथे गेल्या चोवीस तासात चार ठिकाणी ढगफुटी झाली आहे. एकाच दिवसांत ११ जणांचा मृत्यू झाला असून १८ वाहनांची हानी झाली आहे. सिमल्यातील वाहतूक सुरक्षितेसाठी बंद केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून संवेदनशील भागात चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी हवाई पाहणी केली आणि नुकसानीचे आकलन केले होते. या पावसामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा त्यांनी दावा केला.
हिमाचल प्रदेशाने यंदाच्या मोसमामध्ये दोन महिन्यांत तीन दिवस विक्रमी पावसाचा अनुभव घेतला आहे. सिमला व सोलन जिल्ह्यात १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्टला पावसाने विक्रमी हजेरी लावली.२२ ऑगस्टच्या रात्री मुसळधार पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आणि भूस्खलनाचे प्रकार घडले. या तिन्ही दिवसाच्या पावसाने राज्यात मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली असून केंद्राने राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणावर मदत मागितली आहे.
Himachal Pradesh Heavy Rainfall Landslide Disaster