इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकातील उडुपी येथील महाविद्यालयातून सुरू झालेला हिजाबचा वाद सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर हिजाबशी संबंधित वाद अनेक ठिकाणी समोर येताना दिसत आहेत. कर्नाटकात एका महिला परीक्षा निरीक्षकाला डोक्यावर स्कार्फ घातल्याबद्दल निलंबित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम मुलींना हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश द्यावा आणि परीक्षेला परवानगी द्यावी, यासंदर्भात संबंधित महिला प्रशासनाशी वाद घालत होती.
बंगळुरू येथील सिद्धगंगा शाळेत हा प्रकार घडला. परीक्षा निरीक्षक नूर फातिमा यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. बंगळुरू नॉर्थ येथील ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर म्हणाले, “परीक्षा सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी मुख्य अधीक्षकांशी वाद घातला. मुलींना हिजाब घालून परीक्षेला बसण्याची परवानगी नाही. तरीदेखील या नियमाचे पालन संबंधित महिला निरिक्षक करत होती. “
या प्रकरणात अशीही माहिती समोर येते आहे की, यावर्षी कर्नाटकातील अनेक मुली दहावीच्या परीक्षेला बसल्या नाहीत. याचे कारण हिजाब घालून वर्गात जाण्यास मज्जाव केला जात आहे. धार्मिक मुद्द्याला महत्त्व देऊन विद्यार्थी शिक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे यामुळे समोर आले आहे. सोवर, बागलकोट येथील एका विद्यार्थिनीने याच कारणावरून परीक्षा देण्यास नकार दिला. कर्नाटक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दहावी परीक्षेत ८ लाख ६९ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, पण प्रत्यक्षात ८ लाख ४८ हजार ४०५ विद्यार्थीच परीक्षेला बसले आहेत. म्हणजे २० हजार ९९४ विद्यार्थी परीक्षेला बसलेले नाहीत. कर्नाटकात अनेक विद्यार्थिनींनी एका वेगळ्या खोलीत जाऊन हिजाब काढून परीक्षा दिली.
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबला इस्लाममध्ये आवश्यक मान्यता नसल्याचे सांगितले होते. प्रत्येकाने एकसमान पोशाख नियम पाळावा. कर्नाटक सरकारनेही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी पालन करायचे असल्याचे स्पष्ट केले आहे. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याला त्याच परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशी ताकीदही देण्यात आली आहे.